महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक आणि लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. संभाजी ब्रिगेड या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही शाई फेक केली आहे. गिरीश कुबेरांनी त्यांच्या पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे लिखाण केल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडने नोंदवला आहे. त्यामुळेच ही शाईफेक करण्यात आली आहे.
रविवार, ५ डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात एका परिसंवादात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे सहभागी होणार होते. त्यासाठीच ते नाशिक येथे दाखल झाले होते. साहित्य संमेलन सुरु असलेल्या परिसरातच त्यांच्या चेहऱ्यावर ही शाई फेकण्यात आली. संभाजी ब्रिगेड या संघटनेने याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून या प्रकरणात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जमा होत त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचेही सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या
भारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य
राज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण
गिरीश कुबेर यांनी ‘रेनेसान्स स्टेट’ या नावाने लिहिलेल्या एका पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा मजकूर लिहिल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या संदर्भात त्यांनी गिरीश कुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी त्यांनी गिरीश कुबेरांकडे वारंवार वेळ मागूनही कुबेरांनी ही वेळ त्यांना दिली नाही. तर संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख व्यक्तींचे फोनही गिरीश कुबेर यांनी उचलले नाहीत. त्यामुळे चिडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक येथे ही शाईफेक करण्यात आल्याचे समजते
दरम्यान आपल्या लिखाणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची गिरीश कुबेर यांची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही दैनिक लोकसत्तामध्ये लिहिलेल्या अग्रलेखातून चुकीची मांडणी केल्यामुळे कुबेरांवर अनेकदा टीका झाली आहे. तर मदर तेरेसा यांच्या धर्मांतर कार्यावर लिहिलेला अग्रलेख परत घेत दिलगिरी व्यक्त केल्यामुळेही त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठली होती.