श्रीकांत पटवर्धन
२२ जानेवारी हा अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभदिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी तथाकथित आधुनिक, पुरोगामी, निधर्मी, सर्वधर्मसमावेशक, किंवा अल्पसंख्याक तुष्टीकरणवादी, अशा उच्चशिक्षित विद्वज्जनांची अस्वस्थता कमालीची वाढत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ४ जानेवारीला एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात (लोकसत्तेत) आलेला मिलिंद मुरुगकर यांचा लेख.
“सामाजिक व आर्थिक प्रश्नांचे अभ्यासक” अशी ओळख करून देण्यात आलेल्या या विद्वान लेखक महाशयांनी अयोध्येतील अन्यायग्रस्तता चक्क “रुजवलेली” ठरवून टाकली आहे. भरीसभर म्हणून, संपादकांनी ५ जानेवारीच्या अंकात मूळ लेखाची भलावण करणारी तीन वाचकपत्रे छापली. कोणी त्या “अन्यायग्रस्तते”चा संबंध “जातीयते”शी जोडला, तर कोणी “राजकीय
महत्वाकांक्षे”शी. एकाने तर अयोध्येत रामलल्लाना त्यांचे हक्काचे घर पाचशे वर्षांनी मिळत असल्याबद्दल ढाळल्या गेलेल्या अश्रूंना चक्क “नक्राश्रू” , मगरीचे अश्रू – ठरवले आहे.
हा या देशातील कोट्यवधी हिंदू बांधवांना अयोध्येत रामजन्मभूमीत श्रीराम सन्मानपूर्वक प्रतिष्ठापित होत असल्याबद्दल वाटणाऱ्या अत्यंत सार्थ आनंदाच्या भावनांचा अनादर आहे. तथाकथित विचारवंतांच्या ह्या दुष्प्रचाराला तर्कशुद्ध उत्तर देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण इथे मुरुगकर यांच्या लेखाला प्रत्युत्तर देऊ.
काय अयोध्येच्या बाबतीत झालेला अन्याय खोटा, रुजवलेला आहे ?
‘रुजवलेली अन्यायग्रस्तता’ म्हणजे अर्थात मुळात नसलेली, ‘खोटी’ अन्यायग्रस्तता लेखकाने दिलेली एलिझाबेथ लोफ्तस या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाच्या प्रयोगातील उदाहरणे सुद्धा “मुळात न घडलेल्या गोष्टींबद्दल उगीचच, विनाकारण वाटणारे – रुजवले गेलेले दुःख” – वाटून घेऊन मनुष्य कसा विनाकारण दुःखी होतो, हेच दर्शवतात. अयोध्येबद्दल लोकांना वाटणारे दुःख हे असे आहे का ? अयोध्येत श्रीरामजन्मभूमीबाबत श्रीरामावर झालेला अन्याय हा असा ‘खोटा’ ‘रुजवलेला’ आहे का ?
अयोध्येबाबत अनेकांना वाटणारी ही अन्यायग्रस्तता जर अशी ‘खोटी’ ‘रुजवलेली’, ‘उगीचच’ असेल, तर ह्या बाबतीत सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे , सामान्य लोकांचे जाऊ द्या; पण खुद्द सर्वोच्च न्यायालय कसे “फसले” ?(!) सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात ह्या अन्यायग्रस्ततेचा कथित खोटेपणा कसा आला नाही ? रामजन्मभूमीवरचा हिंदूंचा दावा – खोटी, रुजवलेली अन्यायग्रस्तता – असल्याचे सिद्ध होऊन, फेटाळला कसा गेला नाही ? हिटलरी पद्धतीने, इतिहासाची मोडतोड
करून, मुळात काहीही अन्याय वगैरे झालेला नसताना, देशातल्या बहुसंख्य समाजाला मूर्ख बनवून, हा तथाकथित अन्याय दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला साकडे घालणे आणि अनेक वर्षांच्या न्यायालयीन संघर्षाचे फलित म्हणून अखेर तो (तथाकथित ?) अन्याय दूर केला जाणे – हे कसे घडले ? जर मुळात अन्यायच नसेल, तर देशाचे सर्वोच्च न्यायालय फसवले गेले का ?ह्याचे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असेच आहे. अयोध्येबाबत झालेला अन्याय रुजवलेला, खोटा नसून पूर्णपणे खरा आहे. त्या अन्यायाचे ऐतिहासिक, लिखित कागदोपत्री पुरावे आहेत, जे सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरले गेलेत. मुरुगकर यांनी अयोध्या विवादातले सर्वोच्च न्यायालयाचे विस्तृत निकालपत्र अजिबात वाचलेले नसावे.
१. बाबराचा सेनानी मीर बाकी याने तिथे मुळात असलेले राम मंदिर पाडले, ह्याचा पुरावा खुद्द बाबराने काढलेल्या ‘शाही फर्माना’त च मिळतो. ह्या शाही फर्मानाचा अनुवादित सारांश असा : ‘शहेन शाह ए हिंद मलिक उल जहान बादशहा बाबर यांच्याहुकुमावरून अयोध्येतील रामजन्मस्थान पाडून उद्ध्वस्त करण्याची ‘परवानगी’ दिली गेली आहे. हे स्थान नष्ट करून, त्यातून मिळालेल्या सामग्रीतून त्या जागी मशीद उभारण्याचे शाही आदेश आहेत. हिंदुस्थानातील अन्य भागातून कोणीही हिंदू अयोध्येत प्रवेश करू शकणार नाही हे काटेकोरपणे पहावे लागेल. जर असा कोणी हिंदू अयोध्येत आलेला दिसला आणि त्याच्या हेतूविषयी संशय आला तर त्याला पकडून ठार करणे हे तुमचे कर्तव्य राहील.
२. ६ डिसेंबर १९९२ मध्ये जी वास्तू पाडली गेली, ती मशीद नसून केवळ विवादित ढांचा होता, हे दर्शवणारे पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे ‘साहिफा ए चहल नसा इ बहादुरशाही’ हा बहादुरशहा (सतराव्या शतकाची अखेर / अठराव्या शतकाचा प्रारंभी होऊन गेलेला) च्या कारकिर्दीचे वर्णन करणारा ग्रंथ. त्या ग्रंथात असे स्पष्ट म्हटलेले आहे, की बादशहाच्या हुकुमाने (फर्माने बादशाही) ज्या ‘मशिदी’ बांधण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये नमाज / खुत्बा पढण्याची परवानगी नाही. हिंदूंची (काफिरांची) त्यांच्या मथुरा, काशी, अयोध्या येथील मंदिरांवर फार श्रद्धा असते. (इथे मथुरेतील कृष्ण जन्मस्थान, अयोध्येतील रामजन्मभूमी, सीता रसोई व हनुमानस्थान यांचा उल्लेख आहे). ही सर्व स्थाने उद्ध्वस्त करण्यात येऊन त्या ठिकाणी ‘मशिदी’ बांधण्याचा उद्देश केवळ इस्लामी सत्तेचे सामर्थ्य दाखवण्याचा च होता. ह्या ‘मशिदीं’ना जुमा / जमियत अदा करण्याची परवानगी नव्हती. मात्र त्यांमध्ये कुठल्याही मूर्तीची पूजा होणार नाही तसेच शंखनाद केला जाणार नाही, असे सक्त आदेश होते.
इस्लामच्या संकेतानुसार जिथे नियमित नमाज अदा केला जात नाही, ती ‘मशीद’ असूच शकत नाही. ह्यावरून हे लक्षात येते, की अयोध्या, मथुरा, काशी ह्या पवित्र तीर्थक्षेत्रांत उभारण्यात आलेल्या ‘मशिदी’ ह्या वास्तविक मशिदी नसून वेगळ्या उद्देशाने (पराभूताना अपमानित करण्याच्या आणि सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने) उभारलेल्या वास्तू आहेत.
३. लेखक म्हणतात, की “स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितले होते, की आपण दोनशे वर्षे ब्रिटीशांच्या राजवटीत राहिलो आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी गुलामगिरीतून मुक्त झालो. आता आपल्याला सांगण्यात येत आहे, की आपण हजार वर्षे गुलामगिरीत होतो. अयोध्येतील त्या महिला पत्रकाराच्या अश्रूंचा संबंध या हजार वर्षांच्या अन्यायग्रस्ततेशी आहे.” लेखक हे विसरतात, की ब्रिटीशांची राजवट दीडदोनशे वर्षे होती, हे जितके खरे आहे, तितकेच आपण त्या आधी सात आठशे वर्षे मुस्लीम परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीत होतो, हे ही खरे आहे. हे कोणी मुद्दाम रुजवलेले, खोटे सांगितलेले नाही. हे सत्य आहे.
हे ही वाचा:
मार्कोस कमांडोनी जहाज घेतले ताब्यात; वाचवले भारतीयांचे प्राण!
पन्हाळ्याच्या शेजारी पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा केला जमीनदोस्त
अवघ्या १० दिवसांत अंबती रायुडू वायएसआर काँग्रेसमधून ‘आऊट’!
बंगाल रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्येंना अटक!
४. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मुक्ती संघर्षाला सुमारे ५०० वर्षांचा इतिहास आहे. इ.स. १५२८ ते १९३४ पर्यंत तिथे त्यासाठी ७६ युद्धे लढली गेली, ज्यात हजारो वीरांनी आपले रक्त सांडले आहे, बलिदान दिले आहे. त्यानंतर एक प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढली गेली, ज्यात हजारो लिखित पुरावे तपासले गेले, जे न्यायालयाने ग्राह्य धरले. ह्या सगळ्याला हिटलरी पद्धतीने रुजवलेली खोटी अन्यायग्रस्तता म्हणणे हे नुसते अनाकलनीयच नव्हे, तर अपमानास्पद आहे. लेखकाला रामजन्मभूमी मुक्ती संघर्षाचा इतिहास माहित नसणे एकवेळ समजू शकते. पण त्याचा भारतीय न्याययंत्रणेवर , सर्वोच्च न्यायालयावर विश्वास का नसावा ? अयोध्येतील अन्यायग्रस्तता जर खोटी असेल, तर त्याचा सरळ अर्थ सर्वोच्च न्यायालय फसवले गेले आहे, असा होतो.
अयोध्येतील अन्याय – परकीय आक्रमक बाबराने केलेला अन्याय – अगदी खराच होता; तो आता पाचशे वर्षांनी दूर झाला आहे. आता त्यासाठी येणाऱ्या आनंदाश्रूंना ‘विनाकारण’ किंवा “नक्राश्रू” ठरवणे म्हणजे कोट्यवधी लोकांच्या प्रामाणिक भावनांचा अनादर करणे होय. धार्मिक भावना जणू काही केवळ अल्पसंख्याकानाच असतात, बहुसंख्यांना नव्हे – असे मानले जाण्याची या देशात गेली सत्तर वर्षे प्रथा पडलेली आहे. हिंदूंनी आता ही प्रथा मोडीत काढून, आपल्यालाही धर्मभावना असतात, आहेत, हे ठामपणे दाखवून द्यावे लागेल. मदर टेरेसांवरचा अग्रलेख ख्रिश्चनांच्या भावना दुखावल्या, म्हणून क्षमा मागून मागे घेणाऱ्या लोकसत्तेला, हिंदूंच्या भावना खुशाल पायदळी तुडवणारा मुरुगकर यांचा लेख छापताना काहीच वाटत नाही, हे दुर्दैव.