सतत रडणे,गप्प गप्प राहणे; ओडिशा अपघातातील जखमी मनोविकाराने ग्रस्त

रुग्णांची मानसिक स्थिती पाहता रुग्णालयातील सर्व रुग्णांचे समुपदेशन करण्यास सुरुवात

सतत रडणे,गप्प गप्प राहणे; ओडिशा अपघातातील जखमी मनोविकाराने ग्रस्त

ओडिशा रेल्वे अपघातातून बचावलेल्या जखमी प्रवाशांमध्ये पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसॉर्डर पाहायला मिळत आहे. या रुग्णांवर डॉक्टर उपचार करत असून तज्ज्ञांची टीम त्यांचे समुपदेशन करत आहे. या अपघातामधील जखमी प्रवाशांपैकी कुणी घाबरत असून कोणी गप्पच गप्पच राहात आहे. तर, काही जणांच्या डोळ्यांसमोर त्या भयंकर अपघाताची दृश्ये येत आहेत.

ओडिशाच्या बालासोर रेल्वे अपघातातून बचावलेल्या १०५ रुग्णांवर कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ४० जण पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसॉर्डर (पीटीएसडी)ने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. या सर्व रुग्णांच्या समुपदेशनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत डॉक्टरांची टीम रुग्णांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉक्टरांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

 

‘अपघातातून बचावलेल्या रुग्णांची मानसिक स्थिती पाहता रुग्णालयातील सर्व रुग्णांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या भयावह अपघाताचा परिणाम बचावलेल्या प्रवाशांवर होणे स्वाभाविक आहे,’ असे क्लिनिकल सायकोलॉजी विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. जशोबंता महापात्र यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मँचेस्टर सिटी पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगचे विजेते

शुभमन गिलला ढापला?

शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अजित पवारांना डावललं?

कुस्तीगीर म्हणतात, सर्व प्रश्न सुटले तरच आशियाई स्पर्धेत खेळू!

 

‘काही रुग्ण गंभीर तणावग्रस्त, भेदरलेले तर कधी कधी घाबरलेल्या अवस्थेत आहेत. काही जखमी तर गप्प गप्पच राहात आहेत. आम्ही त्यांचे समुपदेशन करत आहोत आणि त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करत आहोत. रुग्णालयातील जखमी प्रवाशांच्या समुपदेशनाची चार गटांची स्थापना केली आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली. प्रत्येक गटात एक मनोविकारतज्ज्ञ, एक मानसोपचारतज्ज्ञ, एक सामाजिक कार्यकर्ता आणि रुग्णाच्या कुटुंबातील एक किंवा दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘जे बचावले आहेत, ते शांतपणे झोपू शकलेले नाहीत. त्यांच्या डोळ्यांसमोर आताही त्या अपघाताची भयानक दृश्ये येत आहेत. अपघाताची स्वप्ने पडून त्यांची झोपमोड होत आहे, ’ अशी माहिती एका परिचारिकेने दिली.

 

अपघातातील एका २३ वर्षीय प्रवाशाचे दोन्ही हात-पाय तुटले आहेत. त्याच्या डोळ्यांसमोर सारखी अपघाताची दृश्ये तरळत असल्याने तो डोळे बंद करायलाही घाबरत आहे. तर, एका प्रवाशाने आपल्या जवळच्या मित्राला गमावले आहे. तो झोपेतही या मित्राचे नाव घेतो आणि दचकून उठतो. तर, काहीजण भिंतीकडे नुसते एकटक पाहात आहेत. काही जखमी स्वत:ची परिस्थिती पाहून सतत रडत आहेत. तर, काही जोरजोराने हसत आहेत. मात्र ही लक्षणे हळूहळू दूर करता येतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

 

पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसॉर्डर म्हणजे काय?

मोठी दुर्घटना किंवा खूप वाईट परिस्थितीचा सामना केल्यानंतर रुग्णांना पीटीएसडी या मानसिक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. या आजारात अपघाताची घटना सातत्याने आठवणे, घटनेशी संबंधित स्वप्ने पडणे, अति अस्वस्थता येणे आणि घटनेनंतर सातत्याने मनात विचार येणे अशी लक्षणे आढळतात. त्यामुळे सर्वसामान्यपणे जीवन जगणे मुश्कील होते. या बिकट परिस्थितीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी कधी कधी हे रुग्ण स्वत:ला नुकसान करण्याचीही शक्यता असते.

Exit mobile version