कोरोना काळानंतर राज्यात आज दहीहंडीचा उत्साह असून शिंदे- फडणवीस सरकारने गोविदांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दहीहंडी उत्सवादरम्यान कोणत्याही गोविंदाला दुखापत झाल्यास त्याला शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा जखमी झाल्यास राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. तसेच हा शासन निर्णय स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहणार असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, शिंदे- फडणवीस सरकारने यंदा दहीहंडी पथकासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. गोविंदांची मागणी होती की या उत्सवाचा साहसी खेळ म्हणून समावेश व्हावा. त्यानंतर गोविंदा उत्सवाचा क्रीडाप्रकारात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दहीहंडीदरम्यान एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर शासनाकडून १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर गोविंदा जबर जखमी झाला तर ७.५० लाख आणि त्याच्या अवयवाला गंभीर इजा झाली तर ५ लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
अग्निवीर भर्तीपूर्व परीक्षेत धावताना तरुण गतप्राण
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर सीबीआयची छापेमारी
कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट
दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे
तसेच गणेशोत्सवात आणि दहीहंडी उत्सवात कायदेशीर सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात कायदेशीर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. ज्यांनी ५ लाखांपेक्षा कमी नुकसान केलं असेल अशा खटल्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.