मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी तसेच ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने आज (दिनांक २५ जुलै २०२३) बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार, दरवर्षी मुंबईतील सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांचे रेबिज लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी दोन्ही संस्था नि:शुल्क सेवा देणार आहेत.
हा सामंजस्य करार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, सहायक महाव्यवस्थापक तसेच या उपक्रमाचे समन्वयक डॉ. मनोजकुमार माने, मिशन रेबिजचे संचालक डॉ. मुर्गन अप्पुपिलाई, मुंबईचे प्रभारी डॉ. अश्विन सुशील, प्रकल्प प्रमुख डॉ. स्नेहा ताटेलू यांची उपस्थिती होती.
हे ही वाचा:
पंतप्रधानांचा घणाघात; इस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीननेही ‘इंडिया’ शब्द वापरला!
ब्रदीनाथ महामार्ग वाहून गेल्याने १००० यात्री अडकले
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांची ५ तास चौकशी
महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थानचा क्रमांक पहिला
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत कुत्र्यांपासून होणाऱया रेबिज रोगाच्या निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. २०१४ च्या सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटकी कुत्री होती आणि ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या कुत्र्यांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिजची लस देणे गरजेचे असते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. पण या सामंजस्य करारामुळे लसीकरणाला अधिक गती येईल. सामंजस्य करारानुसार, सप्टेंबर २०२३ पासून या उपक्रमाची सुरुवात होईल. तर जानेवारी २०२४ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले जाईल. त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी २०२३ मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात येईल. या मोहिम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांना रेबिजची लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.