सावरकरांच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाची अंमलबजावणी केली असती तर…

माहिती आयुक्त उदय माहूरकर यांचा दावा

सावरकरांच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाची अंमलबजावणी केली असती तर…

स्वातंत्र्यसेनानी सावरकर यांच्या धोरणात्मक दृष्टीकोनातून आधीच्या केंद्र सरकारांनी नियोजन केले असते तर भारत आजपर्यंत जागतिक महासत्ता बनला असता, असा दावा भारताचे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी केला आहे.वीर सावरकरांच्या सुरक्षेची दृष्टी अमलात आणली असती, तर आजपर्यंत आपले सशस्त्र दल तसेच विद्यार्थी पूर्णपणे प्रशिक्षित झाले असते आणि भारत आता महासत्ता बनला असता असेही ते म्हणाले.

उदय माहूरकर यांनी राजधानी नवी दिल्लीत वरिष्ठ नौदल अधिकारी आणि नौदल विद्यार्थ्यांना संबोधित करताना वीर सावरकरांच्या धोरणात्मक दृष्टीवर तपशीलवार प्रकाश टाकला. नौदल उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल एस. एन. घोरमाडे यांनी खास या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या निमंत्रणावरून उदय माहूरकर यांनी वरिष्ठ नौदल अधिकारी आणि नौदल विद्यार्थ्यांना “वीर सावरकरांची धोरणात्मक दृष्टी” या विषयावर संबोधित केले.

उदय माहूरकर म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांना आपण फक्त क्रांतिकारक म्हणून ओळखतो. पण ते राष्ट्रवादी विचारवंत होते. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाचे मूळ तत्व मांडले. मी १९८६ पासून त्यांच्या विचारांचा अभ्यास केला आहे. त्यांनी भारताच्या धोरणात्मक आणि संरक्षण धोरणाचा मूलभूत विचार केला आहे. त्यामुळे भारताने आता त्यांच्याकडे संरक्षण आणि धोरणात्मक धोरणाचे जनक म्हणून पाहिले पाहिजे.

मोदी सरकारच्या धोरणांवर समाधान व्यक्त करताना माहिती आयुक्त म्हणाले की, सावरकरांनी भारताच्या संरक्षण धोरणाचा सखोल अभ्यास केला होता. यामुळेच त्यांनी यासंदर्भात अत्यंत मौलिक महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यावेळी त्या सूचनांकडे लक्ष दिले असते तर भारत आजपर्यंत जागतिक महासत्ता झाला असता, असे उदय माहूरकर म्हणाले. भारताने आता वीर सावरकरांची धोरणात्मक दृष्टी आणि संरक्षण धोरणे आत्मसात करून त्यांची अंमलबजावणी सुरू केल्याचे समाधान माहूरकर यांनी व्यक्त केले.

Exit mobile version