रास्त दरात विमान वाहतूकसेवा पुरवणारी इंडिगो कंपनी एअरबस कंपनीकडून ५०० ए३२० प्रवासी वाहतूक विमानांची खरेदी करणार आहे. ही विक्रमी खरेदी मानली जात आहे. या खरेदीकरारामुळे याच वर्षी एअर इंडिया आणि बोइंगने एअरबससह केलेल्या विमानखरेदीचा विक्रम मोडला गेला आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या मते, एअरबससह कोणत्याही एअरलाइन कंपनीने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी एकल विमान खरेदी आहे. या ऑर्डरमुळे इंडिगो जगातील सर्वांत मोठी A320 ही प्रवासी वाहतूक विमाने खरेदी करणारी कंपनी ठरली आहे.
विमानाच्या इंजिनाची निवड आणि A320 आणि A321 विमानांचे अचूक मिश्रण योग्य वेळी केले जाईल, असे एअरलाइनतर्फे सांगण्यात आले आहे. विमान कंपनी आणि एअरबसच्या उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १९ जून रोजी ‘पॅरिस एअर शो २०२३’ मध्ये या खरेदी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ४८० विमानांच्या मागील ऑर्डरसह, इंडिगोच्या ऑर्डर-बुकमध्ये आता जवळपास एक हजार विमाने आहेत, असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे. या नवीन खरेदीकरारामुळे इंडिगोला सन २०३० आणि २०३५ दरम्यान विमानांची वानवा जाणवणार नाही. सध्या इंडिगो एअरलाइन ३००हून अधिक विमाने चालवते. लवकरच एअरलाइनच्या ताफ्यात A320NEO, A321NEO आणि A321XLR विमाने येतील.
‘ही नवीन ऑर्डर इंडिगो आणि एअरबस यांच्यातील धोरणात्मक संबंध आणखी दृढ करेल. सन २००६मध्ये स्थापन झालेल्या इंडिगोने आतापर्यंत त्याच्या स्थापनेपासून एअरबसकडून एकूण एक हजार ३३० विमानांची मागणी नोंदवली आहे,’ असे एअरलाइनच्या निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा:
दर्शना पवारच्या मृत्यूचे कारण समोर
झेलेन्स्कीना मिळाली ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांच्या आईकडून गोड भेट…
‘न्यूज अरेना इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपा अव्वल, तर फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पसंती
सिक्कीममध्ये पावसाचा तांडव, ३०० पर्यटकांना बाहेर काढण्यात यश
‘A320NEO या इंधन कार्यक्षम प्रवासी वाहतूक विमानामुळे इंडिगोला रास्त दरात वाहतूकसेवा पुरवण्याचे लक्ष्य राखून ठेवणे तसेच, विश्वासार्हता टिकवून ठेवण्यास मदत मिळेल. इंधन कार्यक्षम विमानसेवेमुळे सन २०१६ ते २०२३ दरम्यान आम्ही कार्बन उत्सर्जन २१ टक्के घटवण्यात यशस्वी झालो आहोत,’ असेही इंडिगोने निवेदनात म्हटले आहे.