संघातील खेळाडूंची फेररचना करून पाहण्याच्या भारताच्या संधीवर पावसाने पाणी फेरले. शनिवारी, १५ जून रोजी भारताचा गटसाखळीतील शेवटचा सामना कॅनडाविरोधात होता. मात्र फ्लोरिडातील खेळपट्टी ओलीच राहिल्याने हा सामना झालाच नाही. पंचांनी दोनदा खेळपट्टीची पाहणी केली आणि रात्री नऊ वाजता हा सामना होणार नाही, असे जाहीर केले.
भारताने सुपर आठमध्ये आधीच प्रवेश केल्यामुळे आणि कॅनडा स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्यामुळे पंचांनीही खेळाडूंना खेळताना कोणतीही दुखापत होऊ नये, याची खबरदारी घेतली. रात्रभर पाऊस पडल्यामुळे संपूर्ण मैदानच ओले होते. स्टेडिअमच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत करूनही मैदानावर अनेक ठिकाणी डबके साचले होते. ही परिस्थिती खेळण्यायोग्य नव्हती. त्यामुळे या सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी फ्लोरिडातील लॉडरहिल येथे मोठ्या संख्येने आलेल्या क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. सामना लांबल्यामुळे राहुल द्रविडसह भारताचे खेळाडू आणि कोचिंग स्टाफने मैदानात फेरफटका मारला आणि चाहत्यांसाठी स्वाक्षरीही केली.
हे ही वाचा..
निवडणूक होताच काँग्रेसचा खरा चेहरा उघड; कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ
उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० हून अधिक भाविकांचा मृत्यू
ठाण्यातून ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेविका मुख्यमंत्री शिंदेच्या गटात सामील!
सिक्कीममध्ये भूस्खलन होऊन १२०० हून अधिक पर्यटक अडकले; नऊ जणांचा मृत्यू
फ्लोरिडामध्ये संपूर्ण वॉशआउट?
फ्लोरिडामध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियममधील पाणी निघून जाण्याची यंत्रणा कुचकामी आहे. तसेच, खेळपट्टीचे संरक्षण करण्यासाठी आच्छादनांचीही कमतरता आहे. त्यामुळे येथील तीन सामने रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली. ११ जून रोजी श्रीलंका विरुद्ध नेपाळ, १५ जून रोजी अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि १५ जून रोजी भारत विरुद्ध कॅनडा असे तिन्ही सामने रद्द करावे लागले. रविवारी त्याच मैदानावर पाकिस्तानचा संघ आयर्लंडविरुद्ध त्यांचा गटसाखळीतील शेवटचा सामना खेळेल. भारताने गटसाखळीत चार सामन्यांतून सात गुणांची कमाई केली आहे.