भारत आणि इंग्लंड दरम्यान होऊ घातलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेची सुरवात आज झाली. ही संपूर्ण टी -२० मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधेच होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडने भारतावर तब्बल ८ गडी राखून विजय मिळवला आहे.
इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरवात ही ४ कसोटी साम्यांच्या मालिकेतून झाली. या मालिकेतही पहिला कसोटी सामना भारताने गमावला होता. त्या सामन्यातही भारताचा दोनशे पेक्षा जास्त धावांनी दारुण पराभव झाला होता. मात्र त्यानंतरचे तीनही कसोटी सामने भारताने मोठ्या अंतराने जिंकले होते.
आजच्या टी-२० सामन्याची सुरवात होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला होता. भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा हा या सामन्यात खेळणारच नव्हता. त्यात भारताने नाणेफेक हरल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीला देखील उतरावे लागले होते. भारतीय संघाचा आजवरचा टी-२० मधील इतिहास पाहता, भारत धावांचा पाठलाग करताना जास्त विजय मिळवतो. त्यामुळे नाणेफेक हरल्याचा प्रभावही भारतीय संघावर पडला होता.
हे ही वाचा:
एचडीएफसी बँकेचा स्तुत्य उपक्रम
एनसीपीसीआरकडून नेटफ्लिक्सला नोटिस
तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील- किरीट सोमय्या
भारताची फलंदाजी ही अत्यंत निराशाजनक होती. भारतीय कप्तान विराट कोहलीचा खराब फॉर्म सुरूच राहिला आणि विराट शून्य धावांवर बाद झाला. मुंबईकर श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत डाव स्थिरावला, परंतु तरीही २० ओव्हर्स नंतर भारताचा स्कोर हा केवळ १२४/७ एवढाच होता. इंग्लडने सहज या धावसंख्येचा पाठलाग करत अवघ्या १५.३ ओव्हर्समध्येच ८ गाडी राखून हा सामना जिंकला.