कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताला प्रथमच एका मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. २४ वर्षांनंतर प्रथमच भारतीय संघ कसोटी मालिकेत एकही सामना न जिंकता पराभूत झाला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत न्यूझीलंडने २५ धावांनी विजय मिळविला आणि मालिका खिशात घातली. न्यूझीलंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतावर ३-० असा विजय मिळविला. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर भारताला प्रथमच ०-३ असा पराभव पत्करावा लागला.
न्यूझीलंडने पहिली कसोटी बेंगळुरूमध्ये ८ विकेट्सनी जिंकली तर पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने भारतावर ११३ धावांनी मात केली. भारताला याआधी २०००मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ अशी मालिका गमवावी लागली होती. वानखेडे स्टेडियम तसेच बेंगळुरूत भारतीय संघ कसोटी सामने हरला होता. पण त्यानंतर भारताला अशी मानहानी सहन करावी लागली नव्हती.
न्यूझीलंडने भारताला विजयासाठी १४७ धावांचे आव्हान ठेवले होते पण भारताची स्थिती ५ बाद २९ अशी झाल्यानंतर पराभवाची चाहुल लागू लागली. मात्र ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्याआधी, न्यूझीलंडचा डाव १७४ धावांवर आटोपला होता. त्यात रवींद्र जाडेजाने पाच बळी घेतले होते. मात्र अल्प लक्ष्य असूनही ते साध्य करताना भारतीय खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली. कर्णधार रोहित शर्मा ११ धावांवर असतानाच बाद झाला आणि सलामीची जोडी फुटली.
शुभमन गिल याने पहिल्या डावात ९० धावा केल्या होत्या पण यावेळी तो अवघी १ धावा करून बाद झाला. एजाझ पटेलने त्याला बाद केले. त्यानंतर विराट कोहलीदेखील अवघी १ धावा काढून तंबूत परतला. त्याला एजाझ पटेलने डॅरिल मिचेलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर यशस्वी जयस्वाल (५) आणि सर्फराज खान (१) हे लागोपाठच्या षटकांत बाद झाले. मात्र ऋषभ पंतने ४८ षटकांत आपले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर त्याने वॉशिंग्टन सुंदरसह त्याने भारताला उपाहाराला ६ बाद ९२ पर्यंत मजल मारून दिली.
मात्र उपाहारानंतर भारतीय फलंदाजीला पुन्हा गळती लागली. पंतचा अडसर किवींनी दूर केला. एजाझ पटेलनेच त्याला झेलचीत केले. यष्टीरक्षक टॉम ब्लन्डेलकडे त्याने पंतला झेल देण्यास भाग पाडले. पण त्यानंतर भारताचा डाव १२१ धावांतच आटोपला. एजाझ पटेलने ५७ धावांत ६ बळी घेतले.
२०१२नंतर भारतात भारताविरुद्ध मालिका जिंकणारा न्यूझीलंड हा पहिलाच संघ आहे. पण २४ वर्षानंतर भारतीय संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणारा संघ म्हणूनही न्यूझीलंडने आपली छाप पाडली आहे. याआधी १९५५ मध्ये न्यूझीलंडने भारतात कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी भारताने घरच्या मैदानावर सलग १८ मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. तो न्यूझीलंडने विक्रम मोडला. भारताला आता आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेला सामोरे जायचे आहे. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.
हे ही वाचा:
अदानींनी बांगलादेशला दाखवली ‘पॉवर’
१० हत्तींच्या मृत्युनंतर उरलेल्या तीन हत्तींनी घेतला बदला? दोघांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा
दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सापडली काडतुसे
रोहितने चुका स्वीकारल्या
भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मालिका गमावणे हे दुःखकारक असते. आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही. आम्हाला हे स्वीकारावे लागेल. आम्ही अनेक चुका केल्या. पहिल्या डावात आम्ही आवश्यक त्या धावा केल्या नाहीत. इथे आम्ही ३० धावांची आघाडी घेतली आम्ही पुढे असल्याचा विश्वास वाटत होता. निर्धारित लक्ष्यही टप्प्यात होते. पण आम्हाला चांगली कामगिरी करायला हवी होती.
सचिनकडून टीका
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे की, आपल्याच घरच्या खेळपट्टीवर झालेला ०-३ हा पराभव पचवणे कठीण आहे. आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे. आपली तयारी चांगली झाली नव्हती का, फटक्यांची निवड चुकली का, सामन्यासाठी पुरेसा सराव झालेला नव्हता का? न्यूझीलंडने मात्र सातत्यापूर्ण कामगिरीचे प्रदर्शन केले.
इरफान पठाण, हरभजनकडून नाराजी
भारतीय खेळपट्ट्यांवर झालेला हा दारुण पराभव आहे. न्यूझीलंड संघाने केलेल्या या जबरदस्त कामगिरीचे मात्र कौतुक करावे लागेल, असे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठाणने म्हटले आहे.
हरभजनसिंग म्हणतो की, फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्ट्या आता भारतालाच मारक ठरत आहेत. भारतीय संघाला आता चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळावे लागेल. या खेळपट्ट्यांनी भारतीय फलंदाजांना अतिसामान्य ठरविले आहे.
स्कोअरबोर्ड
न्यूझीलंड पहिला डाव २३५ (डॅरिल मिचेल ८२, वॉशिंग्टन सुंदर ८१-४, रवींद्र जाडेजा (६५-५) दुसरा डाव १७४ (विल यंग ५१, रवींद्र जाडेजा ५५-५) विजयी वि. भारत पहिला डाव २६३ (ऋषभ पंत ६०, सुंदर ३८, एजाझ पटेल १०३-५) दुसरा डाव (ऋषभ पंत ६४, एजाझ पटेल ५७-६)
सामनावीर : एजाझ पटेल
मालिकावीर : विल यंग