भारताचा फिनटेक स्टार्टअप इकोसिस्टम २०२५ च्या पहिल्या तिमाहीत निधी (फंडिंग) मिळवण्याच्या बाबतीत अमेरिका आणि यूकेनंतर तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म ट्रॅक्सनच्या अहवालानुसार, या क्षेत्रातील बहुतांश निधी लेट-स्टेज राउंडमध्ये आल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत लेट-स्टेज राउंडमधील फंडिंग ४७ टक्क्यांनी वाढून २२७ दशलक्ष डॉलर्स झाले आहे, जे २०२४ च्या चौथ्या तिमाहीत १५४ दशलक्ष डॉलर्स होते.
२०२५ च्या पहिल्या तिमाहीत फिनटेक स्टार्टअप्सना एकूण ३६६ दशलक्ष डॉलर्सची फंडिंग मिळाली आहे. मार्च महिन्यात कंपन्यांनी सर्वाधिक १८७ दशलक्ष डॉलर्स उभे केले, जे एकूण फंडिंगपैकी ५१ टक्के आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला वाढीच्या गतीमध्ये मंदी, अमेरिकेने लावलेले टॅरिफ्स, जागतिक व्यापारातील तणाव आणि वाढती महागाई यांचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे व्हेंचर कॅपिटल प्रवाहावर परिणाम झाला आहे. या आव्हानांनंतरही भारताच्या जीडीपी वाढीचा दर २०२५ या आर्थिक वर्षात ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा..
संयुक्त अरब अमिरातच्या उपपंतप्रधानांच्या भारत दौऱ्यातून काय साध्य होणार ?
कुणाल कामरा यांच्या याचिकेवर काय म्हणाले न्यायालय
संघप्रमुख मोहन भागवत लखनऊमध्ये दाखल
अहवालानुसार, सिंगापूर, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये यूपीआयच्या वाढत्या स्वीकारामुळे भारतीय फिनटेक कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले ऑपरेशन्स वाढवण्याची आणि अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी मिळत आहे. या क्षेत्रातील काही विशेष विभागांमध्ये भक्कम वाढ पाहायला मिळाली आहे, ज्यात बँकिंग टेक, इंटरनेट-फर्स्ट विमा प्लॅटफॉर्म्स आणि इन्व्हेस्टमेंट टेक हे २०२५ च्या पहिल्या तिमाहीतील टॉप परफॉर्मर ठरले आहेत.
अहवालात म्हटले आहे की २०२५ च्या पहिल्या तिमाहीत बँकिंग टेकला सर्वाधिक १०८ दशलक्ष डॉलर्सची फंडिंग मिळाली आहे, जे २०२४ च्या पहिल्या तिमाहीतील ९९ दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत ९ टक्क्यांनी अधिक आहे. ट्रॅक्सनच्या सह-संस्थापक नेहा सिंग म्हणाल्या, “बाजारातील चढ-उतार असूनही भारतीय फिनटेक क्षेत्राची वाढ सुरू आहे. जरी फंडिंगच्या स्तरात घसरण झाली असली, तरी या उद्योगाच्या दीर्घकालीन वाढीची क्षमता भक्कम आहे.”
अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत १० अधिग्रहणे झाली आहेत. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ही संख्या 6 होती आणि २०२४ च्या अखेरच्या तिमाहीत ५ होती. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत उभ्या करण्यात आलेल्या एकूण फिनटेक फंडिंगमध्ये बेंगळुरू आघाडीवर राहिला, त्यानंतर गुरुग्राम आणि मुंबईचा क्रमांक लागतो.