भारताचा पुन्हा भ्रमनिरास; १९ वर्षांखालील विश्वचषक ऑस्ट्रेलियाने हिरावला

भारताचा पुन्हा भ्रमनिरास; १९ वर्षांखालील विश्वचषक ऑस्ट्रेलियाने हिरावला

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचे भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. बेनोनी येथे रंगलेला हा सामना ऑस्ट्रेलियाने सहजच खिशात टाकला. या स्पर्धेत भारत चौथ्यांदा उपविजेता ठरला आहे. तर, गेल्या पाच स्पर्धांमधील हे तिसरे उपविजेतेपद आहे.

भारताची तगड्या फलंदाजांची फळी अंतिम सामन्यातच पार ढेपाळली. कर्णधार उदय सहारन, मुशीर खान आणि सचिन धस चांगली धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अंतिम सामन्यात २५३ धावसंख्या उभारली. आतापर्यंतच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या. जलदगती गोलंदाज माहली बर्डमन आणि फिरकीपटू राफ मॅकमिलन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेऊन भारताला ४३.५ षटकांत १७४ धावांतच रोखले आणि विश्वचषकाला गवसणी घातली.

दोन महिन्यांपूर्वीच पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाने अहमदाबादमध्ये रंगलेल्या आयसीसी पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पराभव केला होता. त्यापूर्वी लंडनमध्यील ओव्हल मैदानावर भारताने आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपही ऑस्ट्रेलियाकडून गमावली होती. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघाने तोच कित्ता गिरवला.

कर्णधार उदय सहारन याच्या नेतृत्वाखालील संघाने एकही सामना न गमावून अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या तरुणांनी त्यांचे स्वप्न चिरडले. हा ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील विश्वचषक असून सन २०१० पासूनचा पहिलाच आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार हग विबजेन याने ४८ धावा करून करून कर्णधाराला साजेशी खेळी केली. याच स्पर्धेत ३००हून अधिक धावा करणारे उदय सहारन, मुशीर खान आणि सचिन धस अंतिम सामन्यात ढेपाळले. सात सामन्यांत ३९७ धावा करणारा उदय अवघा आठ धावा करू शकला. या स्पर्धेतील त्याची ही एकमेव एक आकडी संख्या. तर, मुशीर खान याने २२ धावा केल्या. तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ९६ धावांची विजयी खेळी करणारा सचिन धस नऊ धावा करून फिरकीपटू राफ मॅकमिलनच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. डावखुरा अष्टपैलू खेळाडू अभिषेक मुरुगन याने नवव्या विकेटसाठी नमन तिवारी याच्यासोबत ४६ धावांची खेळी करून लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र बर्डमन आणि मॅकमिलन यांनी भारतीय संघाला खिंडार पाडून ऑस्ट्रेलियाचा विजयाचा मार्ग सुकर केला.

हे ही वाचा..

ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘त्या’ विद्यार्थ्याला केले एका सत्रासाठी निलंबित

उत्तराखंड: हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक पोलिसांच्या ताब्यात!

सिक्कीम येथील जत्रेत घुसला ट्रक, तीन ठार

निवडणूक निकालानंतर पाकिस्तानमध्ये निदर्शने; निकालविलंबाने गोंधळ वाढला

ऑस्ट्रेलिया संघ सरस

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया आता ५० षटकांच्या स्पर्धेचा विश्वविजेता, जागतिक कसोटी चॅम्पियन, महिलांचा टी २० विश्वचषक आणि महिलांचा ५० षटकांचा विश्वविजेता ठरला असून आता १९ वर्षांखालील विश्वचषकालाही ऑस्ट्रेलियाने गवसणी घातली आहे.

Exit mobile version