नवी दिल्लीत होत असलेल्या जी २० शिखर परिषदेत येणाऱ्या जगभरातील पाहुण्यांसमोर भारताच्या हजारो वर्षे जुन्या कला, संस्कृतीचेही सादरीकरण होत आहे. भारत मंडपम् येथे मिनी भारताचे प्रतिनिधीत्व करणारा कला बाजार भरवण्यात आला आहे.
परदेशी पाहुण्यांना येथे भारताच्या कला संस्कृतीसह औद्योगिक आणि तंत्रज्ञानाचा संगम अनुभवायला मिळेल. केंद्रीय वस्रोद्योग मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, खादी इंडिया आणि जनजाती मंत्रालयाने सर्व राज्यांना सोबत घेऊन भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणारा कला बाजार भरवला आहे. या प्रदर्शनात काश्मीरच्या १५व्या शतकातील पेपरमेशे चित्रकला, चिनारच्या पानांनी काढलेला कशिदा, पंजाबमधील फुलकारी, हिमाचल प्रदेशमधील १६व्या शतकातला चंबा रुमाल, उत्तर प्रदेशमधील विशिष्ट प्रकारची नक्षी, गुजरातच्या काठियावडमधील कढई, पश्चिम बंगालची काथा कारागिरी, मणिपूरची कौना टोकरी, तमिळनाडूच्या चोल वंशाची तंजावूर चित्रकला, कांजीवरम साडी, गुजरातची लिप्पन कला, बिहारची मधुबनी चित्रकला, मध्य प्रदेश व गुजरातची पेथोरा चित्रकला आदींनी सजलेल्या वस्तू पाहायला मिळतील.
हे ही वाचा:
काँग्रेसला टक्कर देणारे राजेंद्रसिंह गुढा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
जी-२० मध्ये पंतप्रधान मोदींकडून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’चा मंत्र
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीकडून अटक
भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्याशहरावर आलीय वाडगा धरण्याची वेळ
उत्तर प्रदेश विभागात परदेशी पाहुण्यांना मुरादाबाद येथील नक्षीदार वस्तू पाहायला मिळत आहेत. येथेच मुरादाबाद येथील पद्मश्री पुरस्कारविजेते दिलशाद हुसैन हे पितळी वस्तूवर नक्षी काढताना दिसतील. त्यांची चौथी पिढी या व्यवसायात आहे. या विभागातही पाहुण्यांना नक्षीदार भांडी खरेदी करण्याची संधी मिळेल. या भांड्यांची किंमत ५० हजार रुपयांपासून एक लाखापर्यंत आहे.
हिमाचल प्रदेशातील विभागात १६व्या शताब्दीतील ‘चंबा रुमाल’ आणि चप्पल पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळेल. येथे दिनेश कुमारी यांनी साकारलेल्या एचा ‘चंबा रुमाला’ची किंमत एक लाख रुपयांहून अधिक आहे. या रुमालावर रेशमी धाग्यांनी मोर, श्रीकृष्ण, गणपतीची चित्रे साकारण्यात आली आहेत.
पंजाब विभागात परदेशी पाहुण्यांना प्रसिद्ध फुलकारी कशी साकारली जाते, ते बघता येईल. येथे ६७ वर्षीय लाजवंती फुलकारी साकारताना दिसतील. तर, हरियाणा विभागात हरियाणातील हिसारस्थित राखीगढीमध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या खोदकामादरम्यान आढळलेल्या ‘सिंधु सरस्वती’ संस्कृतीशी साधर्म्य दाखवणारी भांडी मांडण्यात आली आहेत. जम्मू काश्मीर विभागात जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील याकच्या लोकरीपासून बनवलेल्या शुद्ध पश्मिना कापडाच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.