अफगाणिस्तान हरल्यामुळे भारताचा ‘पराभव’

अफगाणिस्तान हरल्यामुळे भारताचा ‘पराभव’

न्यूझीलंडने टी-२० वर्ल्डकपची गाठली उपांत्य फेरी

अफगाणिस्तान जिंकला तर भारताचे आव्हान जिवंत राहणार या अटकळी अखेर फोलच ठरल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यात अफगाणिस्तानला पराभव सहन करावा लागला आणि भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. न्यूझीलंडने मात्र उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

अबु धाबी येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली खरी पण त्यांना अवघ्या १२४ धावा करता आल्या. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडने दोन फलंदाज गमावले आणि निर्धारित लक्ष्य पूर्ण केले. त्यामुळे अफगाणिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे आता ८ गुण झालेले असल्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला.

डॅरिल मिचेल आणि मार्टिन गप्टिल हे लवकर बाद झाले असले तरी न्यूझीलंडला विजयासाठी आवश्यक धावा करण्यात फारसा अडसर जाणवला नाही. सातव्या षटकात न्यूझीलंडने ५० धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे (ना. ३६) कर्णधार केन विल्यमसन (ना. ४०) यांनी विजयी लक्ष्य गाठून दिले. दोघांनी ६८ धावांची भागीदारी केली. त्याआधी, अफगाणिस्तानने नजिबुल्ला झदरानच्या ७३, गुलबदीन नैब (१५) आणि मोह्म्मद नबी (१४) यांच्या जोरावर शतकी धावांची वेस ओलांडली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून हार सहन करावी लागली होती. तीच भारताच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरली. भारताची आता नामिबियाशी लढत होणार असली तरी त्यातील विजय केवळ दिलासा देण्यापुरताच असेल. या लढतीनंतर विराट कोहलीचे टी-२० कर्णधारपदही संपुष्टात येणार आहे.

 

हे ही वाचा:

पाकिस्तानी कोर्टाने हाफीज सईदच्या सहकाऱ्यांना निर्दोष सोडले

समीर वानखेडेंशी माझा संबंध नाही; क्रूझ प्रकरणातील सुनील पाटीलने उघडले तोंड

पाक नौदलाने केली भारतीय मच्छिमाराची हत्या

भाजपा ही कोणत्याही कुटुंबाभोवती केंद्रित झाली नाही! सेवा, संकल्प, समर्पण हीच आपली मूल्ये

 

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मान न्यूझीलंडने मिळविला आहे.

स्कोअरबोर्ड : अफगाणिस्तान ८-१२४ (नजिबुल्ला झदरान ७३, मोह्म्मद नबी १४, ट्रेन्ट बोल्ट १७-३, साऊदी २४-२) पराभूत वि. न्यूझीलंड २ बाद १२५ (गप्टिल २८, विल्यमसन ना. ४०, कॉनवे ना. ३६).

Exit mobile version