टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहा धावांनी मात केली. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानला १२० धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र पाकिस्तान सात विकेट गमावून केवळ ११३ धावाच करू शकला. टी २० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील भारताचा हा पाकिस्तानविरोधातील आठ सामन्यांतील सातवा विजय ठरला.
या विजयाचे शिल्पकार ठरले जसप्रीत बूमराह आणि हार्दिक पांड्या. ज्यांनी त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण सामनाच फिरवला. पाकिस्तानची धावसंख्या एका क्षणी दोन बाद ७२ होती. मात्र त्यानंतर गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी करून सामना खेचून आणला. जसप्रीत बूमराहने चार षटकांत केवळ १४ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. तर, हार्दिक पांड्याने फखर जमा आणि शादाब खानला बाद करून भारताचे ‘कमबॅक’ करण्यात मुख्य भूमिका बजावली. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलनेही एकेक विकेट घेतल्या. अर्शदीपनेच शेवटचे षटक टाकले. ज्यात पाकिस्तानला १८ धावा करायच्या होत्या.
याआधी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात विराट कोहली बाद झाला. कोहलीने अवघ्या चार धावा केल्या. नसीम शाहने त्याला बाद केले. तर, कर्णधार रोहित शर्माला शाहीन आफ्रिदीने परत पाठवले. रोहितने १३ धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेल व ऋषभ पंतने तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. मात्र पटेल फटका लगावण्याच्या नादात नसीमच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
भारताने ३० धावांत गमावल्या सात विकेट
अक्षर पटेलने बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतदरम्यान चांगली भागीदारी झाली. एका क्षणी भारताची धावसंख्या तीन बाद ८९ होती. ते चांगली धावसंख्या उभारतील, असे वाटत होते. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला एकामागोमाग एक धक्के दिले. भारताने ३० धावांत सात विकेट गमावल्या. भारतीय संघ केवळ १९ षटकेच खेळू शकला. ऋषभ पंतने सर्वाधिक ४२ धावा केल्या. भारताच्या वतीने ऋषभ पंतने सर्वाधिक ३१ चेंडूंत ४२ धावा केल्या. ज्यात सहा चौकारांचा समावेश होता. तर, अक्षर पटेलने दोन चौकार आणि एका षटकारासह १८ चेंडूंत २० धावा केल्या. पाकिस्तानच्या वतीने हारिस रौफ आणि नसीम शाह यांनी तीन-तीन विकेट घेतल्या. तर, मोहम्मद आमिरला दोन विकेट मिळाल्या.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला; नऊ जणांचा मृत्यू
बुलढाण्याला जिल्ह्याला २२ वर्षांनी मंत्रीपद !
शेवटच्या दोन षटकांत सामना फिरला
१४व्या षटकांत पाकिस्तानची धावसंख्या तीन बाद ८० होती. त्यानंतर सामना फिरला. रिझवान-शादाब बाद झाले. १९व्या षटकांत जसप्रीत बूमराह गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देऊन इफ्तिखारची विकेट घेतली. २०व्या षटकांत पाकिस्तानला विजयासाठी १८ धावा हव्या होत्या. अर्शदीपने केवळ ११ धावा दिल्या आणि इमाद वसीमची विकेट घेतली. अशा प्रकारे भारताने असंभव सामन्याचे रूपांतर विजयात केले.
बूमराह ठरला सामनावीर
तीन विकेट घेणारा बूमराह सामनावीर ठरला. तर, हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. अर्शदीप आणि अक्षरने प्रत्येकी एकेक विकेट घेतली.