भारतीय कुस्तीगीरांना सप्टेंबरमध्ये होत असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय तिरंग्याखाली लढता येणार नाही. त्यांना त्रयस्थ खेळाडू म्हणून लढावे लागेल. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होत आहे.
जागतिक कुस्ती परिषदेने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. निवडणुका घेण्यात या संघटनेला अपयश आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने आपल्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलल्या होत्या. याआधी जून २०२३मध्ये त्यांच्या निवडणुका होणार होत्या पण त्यानंतर सातत्याने निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. कुस्तीगीरांची आंदोलने, कायदेशीर बाबींमुळे या निवडणुका होत नव्हत्या. त्यामुळे अखेर जागतिक परिषदेने हे कठोर पाऊल उचलले.
या निर्णयामुळे भारतीय कुस्तीगीरांना आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ध्वजाखाली लढता येणार नाही. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणून या जागतिक स्पर्धेचा दर्जा आहे. त्यामुळे या स्पर्धेत त्रयस्थ खेळाडू म्हणून भारतीय खेळाडूंना सहभागी व्हावे लागेल. ही स्पर्धा १६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सध्या कुस्तीगीर महासंघाचे प्रशासन भूपिंदर सिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील समिती पाहात आहे. पण त्यांना ४५ दिवसांच्या मुदतीत निवडणुका घेता आलेल्या नाहीत. त्यामुळे जागतिक संघटनेने ही कारवाई केली आहे.
हे ही वाचा:
मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड
चांद्रयान- ३ मोहिमेचा प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार
अकेला देवेंद्रने काय करून दाखवले ते बघितले ना?
भारत चंद्रावर आहे; चांद्रयान- ३ च्या यशानंतर इस्रो प्रमुख सोमनाथन यांचे गौरवोद्गार
१२ ऑगस्टला खरे तर कुस्तीगीर महासंघाच्या निवडणुका होणार होत्या. पण त्या झालेल्या नाहीत. याआधी कुस्तीगीर महासंघाला जानेवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा एकदा कुस्तीगीर महासंघावर ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी कुस्तीगीरांनी महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यासाठी आंदोलनेही झाली. निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात आल्या तर मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा जागतिक कुस्ती महासंघाने दिला होता. त्यानुसार आता ही कारवाई झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र आणि त्रिपुरा यांचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकत नाहीत कारण निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र कुस्ती संघटना अपात्र असल्याचे म्हटले आहे तर त्रिपुरा २०१६पासून कुस्ती महासंघाशी संलग्नच नाही, असा दावा करण्यात आला आहे.