भारतीय महिला संघाने बांगलादेशच्या संघाला नमवत ‘महिला आशिया कप २०२४’च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुक्रवार, २६ जुलै रोजी भारत विरुद्ध बांगलादेश असा उपांत्य फेरीचा सामना झाला. यात भारताने बांगलादेशचा १० गडी राखून पराभव केला. यानंतर भारताचा महिला संघ आता थेट अंतिम फेरीत पोहचला आहे. बांगलादेशच्या संघाने भारतीय गोलंदाजांपुढे गुढघे टेकल्याचे दिसून आले.
बांगलादेशने दाम्बुलाच्या मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला त्यांना फारसा न्याय देता आला नाही. फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात खूपच खराब झाली. रेणुका सिंगने पहिल्याच षटकात दिलारा अख्तरला (६) बाद केले. पुढे ठराविक चेंडूनंतर बांगलादेश संघाचे फलंदाज बाद होत राहिले. बांगलादेश कडून सर्वाधिक धावा कर्णधार निगर सुलतान हिने केल्या. तिने ५१ चेंडूत ३२ धावा केल्या. बंगलादेशाच्या संघाची परिस्थिती वाईट असताना कर्णधार निगर आणि शोरना यांनी सातव्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी करत बांगलादेशला ८० धावांपर्यंत नेले. बांगलादेशने भारताला विजयासाठी ८१ धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून रेणुका सिंग हिने तीन फलंदाजांना माघारी धाडले. तर, राधा यादव हिनेही तीन फलंदाजांना बाद केलं. पूजा वस्त्राकार आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
पुढे भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात येताच सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी दमदार खेळी करत केवळ ११ षटकात विजयाला गवसणी घातली. स्मृती मानधना हिने ३९ चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ५५ धावा केल्या. तर, शेफाली वर्माने २८ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने २६ धावांची नाबाद खेळी केली. या शानदार विजयासह भारताने सलग नवव्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताची नजर आता आठव्या विजेतेपदावर असणार आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना कोणाशी होणार हे दुसऱ्या उपांत्य फेरीत यजमान श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर स्पष्ट होईल. २८ तारखेला रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.
हे ही वाचा:
ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी फ्रान्समध्ये रेल्वे लाईन्सवर हल्ला
पठाणकोटमध्ये ७ संशयास्पद व्यक्ती दिसले, जम्मूमध्ये हाय अलर्ट !
सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश
पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!
भारताने आतापर्यंत स्पर्धेतील जेतेपदाचे सर्व सामने खेळले आहेत. सात वेळा ट्रॉफी जिंकणारा भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. एकूण आठ संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात होते. पण, आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आशिया चषकाच्या स्पर्धेनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे एकप्रकारे विश्वचषकाची तयारीच होती असे मानले जाते.