महिला विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजला मोठ्या धावसंख्येने हरवले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय खेळाडूंनी अगदी योग्य ठरवत ३१७ धावांचा डोंगर वेस्ट इंडीज समोर ठेवला. विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा तिसरा सामना असून भारतीय संघाचा हा दुसरा विजय आहे. भारतीय संघाने १५५ धावांनी या सामन्यात विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करत असताना भारताच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. स्मृती मानधना हिने ११९ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १२३ धावा केल्या. तर भाटिया हिने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार मिताली राज आणि दीप्ती शर्मा या अनुक्रमे पाच आणि १५ धावा करून माघारी परतल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हरमनप्रीत कौर हिने भारताचा डाव सावरत १०७ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी केलेल्या शतकी धाव संख्येच्या जोरावर भारताने फलकावर ३१७ धावा जोडल्या. वेस्ट इंडीजची गोलंदाज अनिसा मोहम्मद हिने नऊ षटकांमध्ये ५९ धावा देत भारताचे दोन फलंदाज माघारी धाडले.
हे ही वाचा:
… म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस
मिताली राजने विश्वचषक स्पर्धेत रचला हा विक्रम
‘द काश्मीर फाईल्सला’ प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद! पहिल्या दिवशीच केली एवढी कमाई
भारत आणि श्रीलंकेची ‘गुलाबी’ कसोटी
त्यानंतर ३१८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाची सुरुवात चांगली झाली. डी. डॉटीन हिने ४६ चेंडूत ६२ धावा केल्या तर एच. मॅथ्यूज हिने ३६ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यानंतर मात्र, एकाही वेस्ट इंडीजच्या फलंदाजाला २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलादाजांसमोर गुडघे टेकले आणि वेस्ट इंडीजचा डाव १६२ धावांमध्ये आटोपला. भारताची गोलंदाज स्नेह राणा हिने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. तर मेघना सिंग हिने दोन फलंदाजांना माघारी धाडले. पूजा वस्त्रकार, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी एक एक फालांदाजाला बाद करत आपला या स्पर्धेतील दुसरा विजय साजरा केला.