आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ आज पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला. भारताने या स्पर्धेची दमदार सुरुवात करत मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. भारतीय संघाने तब्बल १०८ धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
नाणेफेक जिंकून कर्णधार मिताली हिने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या स्मृती मानधना हिने ७५ चेंडूत ५२ धावांची खेळी केली तर शेफाली वर्मा हिला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर दीप्ती शर्मा हिने ५७ चेंडूत ४० धावा केल्या. कर्णधार मिताली राज, हरमन कौर, रिचा घोष यांना मात्र चमक दाखवता आली नाही. त्यानंतर स्नेह राणा हिने ४८ चेंडूत ५३ धावा केल्या आणि पूजा वस्त्राकार हिने ५९ चेंडूत ६७ धावा करत भारताच्या फलकावर २४४ धावा लावल्या. पाकिस्तानच्या गोलंदाज एन. दर आणि एन. संधू यांनी प्रत्येकी दोन दोन बळी मिळवले तर डी. बैग, ए. अमिन, एफ. सना यांनी प्रत्येकी एक एक बळी मिळवला.
हे ही वाचा:
४३४; फिरकीपटू अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी
युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?
बीएसएफ जवानाच्या अंदाधुंद गोळीबारात सहा जवान ठार
पंतप्रधान मोदींनी मेट्रो प्रवासात दिव्यांग तरुणांशी मारल्या गप्पा
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानच्या संघाने भारतीय महिला गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. पाकिस्तानकडून एस. अमीन हिने ६४ धावांमध्ये ३० धावा करत सर्वाधिक धावा केल्या. सर्वच भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. राजेश्वरी गायकवाड हिने १० षटकांमध्ये ३१ धावा देत चार बळी मिळवले. तर अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी हिने १० षटकांमध्ये २६ धावा देत दोन, तर स्नेह राणा हिने नऊ षटकांमध्ये २७ धावा देत दोन बळी घेतले. दीप्ती शर्मा आणि मेघना सिंग यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतले आणि पाकिस्तान संघाचा डाव १३७ धावांमध्ये आटोपला. पूजा वस्त्राकार हिला ‘वूमन ऑफ द मॅच’ने सन्मानित करण्यात आले.