बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम

बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम

आयसीसी महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेमध्ये आज हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेश संघावर ११९ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना भारताने ७ बाद २२९ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाचा डाव अवघ्या ११९ धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताला ११० धावांनी मोठा विजय मिळाला आहे. या विजयामुळे भारताचा नेट रनरेट आणखी सुधारला असून सेमीफायनलमध्ये याचा फायदा होणार आहे. या विजयामुळे भारताच्या या स्पर्धेतील आशा अद्याप जिवंत आहेत.

प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात केली. स्मृती हिने ५१ चेंडूत ३० धावा केल्या. तर शेफाली हिने ४२ चेंडूत ४२ धावा केल्या. त्यानंतर यास्तिका भाटिया हिने ८० चेंडूत ५० धावा केल्या. कर्णधार मिताली राज हिला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. गेल्या दोन सामन्यांमध्ये धावा कुटणाऱ्या हरमनप्रीत कौर हिने केवळ १४ धावा केल्या. तर रिचा घोष, पूजा वस्त्राकार, स्नेह राणा यांनी अनुक्रमे २६, ३०, २७ धावा करत भारतीय संघाच्या फलकावर २२९ धावा जोडल्या. बांगलादेशची गोलंदाज रितू मोनी हिने ३७ धावा देत तीन भारतीय फलंदाजांना बाद केले तर नाहिदा हिने दोन फलंदाजांना बाद केले.

त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंसमोर गुढघे टेकले. बांगलादेशची एस. खातून हिने सर्वाधिक ३५ चेंडूत ३२ धावा केल्या तर एल. मोंडल हिने ४६ चेंडूत २४ धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही. फिरकीपटू स्नेह राणा हिने ३० धावा देत बांगलादेशाच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. तर पूजा वस्त्राकार आणि झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी दोन दोन फलंदाजांना माघारी धाडले. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी एक एक फलंदाजाला बाद केले.

हे ही वाचा:

‘गली बॉय’ फेम रॅपर ​​धर्मेश परमारचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक

कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक!

बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारताच्या विश्वचषकातील आशा अद्याप कायम आहेत. मात्र, भारतीय संघाला पुढील उरलेला एक सामना जिंकावा लागणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार असून भारताने हा सामना जिंकल्यास भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

संक्षिप्त धावफलक-

भारत- यास्तिका भाटिया ५०(८०), शेफाली वर्मा ४२ (४२), पूजा वस्त्राकार ३०*(३३); रितू मोनी ३/३७, नाहिदा २/४२, जहानारा अलम- १/५२

बांगलादेश- सलमा खातून ३२(३५), लता २४(४६), मुर्शिदा खातून १९ (५४); स्नेह राणा ४/३०, झुलन गोस्वामी २/१९, पूजा वस्त्राकार २/२६

Exit mobile version