भारतीय महिला हॉकीपटूंची ऐतिहासिक कामगिरी! उपांत्य फेरीत धडक

भारतीय महिला हॉकीपटूंची ऐतिहासिक कामगिरी! उपांत्य फेरीत धडक

टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या महिला हॉकीमध्ये भारतीय संघाचा विजयरथ कायम राहिला आहे. तीन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करत भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात भारताच्या दृष्टीने फारच धमाकेदार झाली आहे. सोमवार, २ ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकमध्ये रंगलेल्या महिला हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघावर १-० अशी मात केली आहे. गुरजीत कौर ही या विजयाची शिल्पकार ठरली. पहिल्या हाल्फमध्ये भारताला मिळालेल्या एका पेनल्टी कॉर्नरवर गोल करत गुरजीतने भारताला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी भारतीय संघाने अखेरपर्यंत टिकवली आणि सामन्यात विजय मिळवला.

हे ही वाचा:

फ्रेंडशिप डे च्या अँबेसेडरवर चीनमध्ये का आहे बंदी?

सिंधूस्थान झिंदाबाद!

…म्हणून साजरा झाला ‘मुस्लिम महिला हक्क दिन’

कोरेगाव भीमा खटल्यावरून न्यायमुर्ती शिंदेंना हटवण्याची मागणी! वाचा काय आहे कारण

भारतीय संघासमोर असलेले ऑस्ट्रेलियाचे आव्हान हे खूपच कडवे मानले जात होते. ऑस्ट्रेलियन संघ आजवर तीन वेळा महिला हॉकीमध्ये सुवर्णपदक विजेता संघ ठरला आहे. तर भारतीय महिला संघाची गेल्या ऑलिम्पिक मधली कामगिरी ही फारशी विशेष नव्हती. त्यांना रिओ ऑलिम्पिकमध्ये एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यात या वर्षी भारतीय महिलांनी आपले पहिले तीन सामने गमावले होते. पण तिथून कमबॅक करणाऱ्या भारतीय महिलांनी मागे वळून पाहिले नाही.

भारतीय महिला हॉकी संघाला आपल्या बचाव फळीवर काम करण्याची गरज असल्याचे पहिल्यापासूनच म्हटले जात होते. पण उपांत्यपूर्व फेरीतील भारतीय संघाचा बचाव बघून साऱ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ऑस्ट्रेलियन संघाला पूर्ण सामन्यात एकूण सात पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. पण त्यातल्या एकाही कॉर्नरवर त्यांना गोल नोंदवता आला नाही.

या सामन्याच्या आदल्या दिवशीच भारतीय पुरुष संघानेही ग्रेट ब्रिटनचा ३-१ असा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे.

Exit mobile version