क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव

क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव

बर्मिंगहम येथे राष्ट्रकुल स्पर्धेचा (Commonwealth Games) थरार अंतिम टप्प्यात आला असून यंदा इतिहासात प्रथमच महिलांच्या टी- २० क्रिकेटचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. या खेळात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. रविवार, ७ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने बाजी मारत भारतीय संघावर नऊ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली तर भारतीय महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा महिलांच्या टी- २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाज एलिसा हेली ही ७ धावा करून तंबूत परतली. त्यानंतर बेथ मूनी आणि कर्णधार मेग लॅनिंग यांनी अनुक्रमे ६१ आणि ३६ धावांची खेळी करत संघाला सावरले. पुढे भारतीय गोलंदाजांमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. भारतीय गोलंदाज रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन दोन खेळाडू माघारी धाडले तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक एक खेळाडूला बाद केले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाने १६१ धावा केल्या.

सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीर स्मृती मंधाना सहा तर शफाली वर्मा ११ धावा करून बाद झाल्या. त्यानंतर आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने भारतीय डाव सावरत सुवर्णपदकाच्या आशा कायम ठेवल्या. त्यांनी अनुक्रमे ३३ आणि ६५ धावांची खेळी केली. मात्र, या दोघीही बाद झाल्यावर एकाही खेळाडूला १५ आकडाही गाठता आला नाही. भारताने सर्वबाद १५२ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने नऊ धावांनी जिंकत सामना खिशात घातला. सुवर्णपदक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने ‘प्रथम विजेता’ होण्याचा मान देखील मिळवला आहे.

हे ही वाचा:

अमृता फडणवीस यांना ‘त्या’ गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग

अग्रलेख लिहिणारे डुप्लिकेट संजय राऊत आहेत का?

१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

कोरोना पॉझिटिव्ह असतानाही ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानात

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुवर्णपदक कमावले असले तरी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आपली एक खेळाडू करोना पॉझिटिव्ह असूनही तिला मैदानात उतरवले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ताहलिया मॅकग्राला करोनाची लागण झाल्याची पुष्टी केली. तरीही तिला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात खेळवण्यात आले. सामन्यादरम्यान इतर खेळाडू ताहलियापासून अंतर राखताना दिसले. तिच्यासोबत आनंद साजरा करताना दिसले नाहीत. मात्र, सामन्यापूर्वी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती असताना खेळाडूला मैदानात का उतरवलं असे प्रश्न उपस्थित करण्यात आले असून याबाबत सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version