पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस प्रभावी ठरत असल्याचे समोर येत आहे. कोव्हॅक्सिन लसीसंदर्भात अनेक प्रकारचे विवाद आणि शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीकडून बुधवारी तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात कोव्हॅक्सिन लस ८१ टक्के परिणामकारक ठरत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती भारत बायोटेकने दिली. त्यामुळे आता परिणामकारकतेच्या बाबतीत कोव्हॅक्सिन लसीने सीरमच्या कोव्हिशिल्ड लशीलाही मागे टाकल्याची चर्चा आहे.
कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत २५८०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. भारतीय वैद्यकीय संशोधन समितीच्या (आयसीएमआर) भागीदारीत या चाचण्या पार पडल्या होत्या. सुरुवातीच्या काळात भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस ६० टक्के प्रभावी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता ही लस अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. तसेच ही लस ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही अधिक परिणामकारक ठरल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
कोरोना लसीकरणाची गती वाढवण्यासाठी सरकारने वेळेची मर्यादा उठवली आहे. देशातील नागरिक आता आपल्या सोयीनुसार २४ तासांत कधीही कोरोनाची लस घेऊ शकणार आहेत. ही घोषणा करताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. “पंतप्रधान मोदी यांना नागरिकांच्या वेळेचं महत्व आणि त्यासोबतच त्यांच्या आरोग्याबाबत चांगली जाण आहे.” असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.