बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!

चक्रीवादळ बार्बाडोसमधून पुढे सरकले; लवकरच विमानतळ खुले होणार

बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपला गवसणी घातली असून आता भारतीय संघ ट्रॉफी घेऊन कधी मायदेशी परतणार याची वाट सर्वच पाहत आहेत. मात्र, भारतीय संघ बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे तिथेच अडकून पडला आहे. या भागात कर्फ्यू सारखी स्थिती असून विमानतळ बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण संघाला हॉटेलमध्येच मुक्काम करावा लागला आहे. यानंतर आता भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ‘बेरिल’ वादळ बार्बाडोसला धडकून पुढे गेलं असून वादळाचा परिणाम आता हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे लवकरच भारतीय संघ मायदेशी परतणार आहे.

बार्बाडोसमध्ये आलेले ‘बेरिल’ वादळ आता पुढे सरकले असून पुढच्या काही तासांत या भागात सर्वकाही शांत आणि सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर विमानतळासह सर्व सुविधा पुन्हा चालू होतील. त्यानंतर रोहित शर्मा आणि संपूर्ण भारतीय संघ मंगळवार संध्याकाळपर्यंत भारताच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करेल.

भारतीय संघ आणि स्पर्धा कव्हर करायला गेलेले परदेशी आणि भारतीय पत्रकार बार्बाडोसमध्ये अडकले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतीय संघ आणि बीसीसीआय सचिव जय शाह हॉटेलमध्येच आहेत. वादळाचा जोर कमी झाल्यानंतर बीसीसीआयने बार्बाडोसमधून निघण्यासाठी स्पेशल फ्लाइटची व्यवस्था केली आहे. काही तासात वादळाचा प्रभाव पूर्णपणे संपून जाईल असा अंदाज आहे.

बार्बाडोसमधील विमानतळ मंगळवार संध्याकाळपर्यंत चालू होऊ शकतो. बार्बाडोसच्या स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी ६.३० वाजता भारतीय संघ मायदेशी येण्यासाठी रवाना होईल आणि बुधवारी रात्री ७.४५ वाजेपर्यंत संघ राजधानी दिल्लीत दाखल होईल.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ

४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या महिलेला घातला सात लाखांचा गंडा

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार भारतीय संघाचे खेळाडू सोमवारी न्यूयॉर्कला रवाना होणार होते. न्यूयॉर्कमधील भारतीय खेळाडूंना कनेक्टेड फ्लाइटने दुबईला जावे लागते, परंतु चक्रीवादळ बेरिलमुळे ते शक्य झाले नाही. दरम्यान, २९ जून रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली. यानंतर भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. याशिवाय बीसीसीआयने भारतीय संघासाठी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे.

Exit mobile version