ठरलं! आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात कोण खेळणार?

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्माकडून संघाची घोषणा

ठरलं! आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात कोण खेळणार?

बहुचर्चित ‘आशिया कप २०२३’ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून आतापर्यंत तीन देशांनी आपले संघ घोषित केले आहेत. त्यानंतर सोमवार, २१ ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआय निवड समितीने १७ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. नवी दिल्लीत निवड समिती आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तानचे संघ खेळणार आहेत. यापूर्वी आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळने संघ जाहीर केले असून भारतीय संघातील खेळाडूंची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.

भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार याकडे लक्ष लागले असताना रोहित शर्मा हा कर्णधार पद भूषविणार असून हार्दिक पांड्या उपकर्णधार पदी असणार आहे. तर के एल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांचे दुखापतीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. संघात शुभमन गिल, विराट कोहली, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाही स्थान मिळाले आहे. ईशान किशनलाही स्थान देण्यात आले आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांची आशिया कपसाठी संघात निवड करण्यात आली आहे. तर, राखीव खेळाडू म्हणून संजू सॅमसन असणार आहे.

हे ही वाचा:

पवारांना एकहाती सत्ता आणता आली नाही असं वळसे पाटील का म्हणाले?

भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मन मंत्र्यांनी चक्क ‘यूपीआय’द्वारे केली भाजी खरेदी

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान !

संजय राऊत म्हणतात पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो, तर निवडणूकही लढू

भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

राखीव खेळाडू-

संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)

Exit mobile version