इराणसमर्थक हौथी बंडखोरांनी लाल समुद्रात एकाही भारतीय जहाजाला लक्ष्य केलेले नाही. बहुतेक सर्व हल्ले हे इस्रायल-हमासदरम्यान ऑक्टोबरमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर झाले असून त्यातही प्रामुख्याने इस्रायल आणि पाश्चिमात्य राष्ट्रांशी संबंधित जहाजांना लक्ष्य करण्यात आले, असे भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरि कुमार यांनी स्पष्ट केले. मात्र लाल समुद्रातील परिस्थिती अस्थिर असून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत भारतीय नौदल येथे तैनात असेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
‘हौथी बंडखोर हे इस्रायल आणि काही पाश्चिमात्य देशांशी संबंधित जहाजांना लक्ष्य करत आहेत. परिस्थिती अस्थिर आहे, परंतु ती बिघडलेली नाही. इस्रायल-हमासमधील संघर्ष जोपर्यंत सुरू राहील, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. परिस्थिती आणखी बिघडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ,’ अशी ग्वाही नौदलप्रमुखांनी दिली.
नौदलाने अरबी समुद्रात चाच्यांविरुद्ध आणि व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी १०० दिवसांची ऑपरेशन संकल्प मोहीम हाती घेतली आहे. याची माहिती देताना ते बोलत होते. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २१ युद्धनौकांसह पाच हजार नौसेनिकांनी २४ तास गस्त घातली आहे. टेहळणी विमानांनी ९०० तास उड्डाण केले आहे. ४५ भारतीयांसह ११० खलाशांचे प्राण व १५ लाख टन सामग्रीचे समुद्री चाच्यांपासून संरक्षण करण्यात आले आहे. ४५० व्यापारी जहाजांना सुरक्षित कवच देण्यात आले आहे, तसेच, तीन हजार किलो अमली पदार्थही जप्त करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.
हे ही वाचा:
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!
केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश!
आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारा आयआयटी गुवाहाटीचा विद्यार्थी ताब्यात!
‘आपण हिंदी महासागरातील सर्वांत मोठी नौदल शक्ती आहोत. त्यामुळे हिंदी महासागर सुरक्षित आणि स्थिर राहावे ही आपली जबाबदारी आहे,’ असे त्यांनी सांगितले.व्यापारी जहाजाचे अपहरण करण्याचा सोमाली चाच्यांचा प्रयत्न भारतीय नौदलाने तब्बल ४० तासांच्या चकमकीनंतर हाणून पाडला आणि १७ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. चककमीनंतर ३५ समुद्री चाच्यांनी शरणागती पत्करली. या चाच्यांना घेऊन २६०० किमीवरून आयएनएस कोलकाता युद्धनौका शनिवारी दिमाखात नौदल गोदीत दाखल झाली. शनिवारी नौदलाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली.
‘समुद्रातील अस्थिर परिस्थितीमुळे व्यापाराला अडथळा येतो. परिस्थिती आणखी बिघडू नये, हे आमचे लक्ष्य आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना हे महत्त्वाचे आहे,’ असे कुमार म्हणाले.