भारतीय रेल्वेने विलगीकरणासाठी जोडले डबे

भारतीय रेल्वेने विलगीकरणासाठी जोडले डबे

भारतात सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज लक्षावधी रुग्ण आढळत असल्याने सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेव प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे आता भारतीयांच्या मदतीला भारतीय रेल्वे धावली आहे. भारतीय रेल्वेने रेल्वेच्या डब्यांमध्ये विलगीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

या कोविड काळात रुग्णांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने रेल्वेचे डबे विलगीकरणासाठी योग्य केले आहेत. भारत सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार आत्तापर्यंत भारतीय रेल्वेने ४००० विलगीकरणाचे डबे तयार केले आहेत. यामधून एकूण ६४,००० विलगीकरणाच्या खाटा रेल्वेने तयार केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाच्या किंवा राज्य सरकारांच्या विनंतीनुसार रेल्वेने हे डबे उपलब्ध देखील करून दिले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांना रेल्वेने सुविधा पुरवली आहे.

हे ही वाचा:

मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू

पप्पूगिरीचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव

गोलंदाज वेंकटेश प्रसाद म्हणतो हनुमान चालिसा

सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे

महाराष्ट्रात नंदुरबार येथे भारतीय रेल्वेने यापूर्वीच रेल्वेचे कोविड विलगीकरण डबे पाठवले होते. आता नंदुरबार पाठोपाठ नागपूरला देखील हे डबे उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यात एक सामंजस्य करार देखील झाला आहे. या करारानुसार भारतीय रेल्वे विलगीकरणाची सोय असलेल्या ११ डब्यांची एक गाडी नागपूरला पाठवणार आहे. यातील प्रत्येक डब्यात १६ रुग्णांची सोय केली जाऊ शकणार आहे. त्याबरोबरच राज्याच्या आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार या डब्यांत आवश्यक त्या सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत. रेल्वेने अजनी आयसीडी भागात यापूर्वीच ठाकरे सरकारच्या विनंतीनुसार काही विलगीकरण डबे पाठवले आहेत.

महाराष्ट्रा व्यतिरिक्त दिल्लीला ७५ डबे पुरवण्यात आले आहेत. या डब्यांमध्ये एकूण १२०० खाटांची सोय करण्यात आली आहे. मध्य प्रदेश राज्य सरकारच्या विनंतीनंतर पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने २० डबे (एकूण ३२० खाटांची सोय) इंदौरनजीक तिही येथे तैनात केले आहेत.

Exit mobile version