पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आत्मनिर्भर भारत चांगलाच गतीत असून यामुळे आता भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील हुगळी नदीकिनारी ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स इंजिनीयर्स लिमिटेड’ (जीआरएसई) केंद्रात भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट १७ अल्फा’अंतर्गत निर्मित ‘विंध्यगिरी’ या युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी जलावतरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, ‘विंध्यगिरी’च्या जलावतरण सोहळय़ाला उपस्थितीत राहिल्यामुळे आनंद वाटतो आहे. हा कार्यक्रम भारताच्या सागरी क्षमता वृध्दिंगत करण्यासाठी टाकलेल्या पावलाचे प्रतीक आहे. जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. सागरी सुरक्षेसाठी भारतीय नौदलाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचाही राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला. तसेच मुर्मू यांनी ही युद्धनौका ‘आत्मनिर्भर भारता’चे प्रतीक असल्याचे नमूद केले. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.
‘प्रोजेक्ट १७ अल्फा’ अंतर्गत एकूण सात युद्धनौकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी ‘विंध्यगिरी’ ही सहावी आहे. या अगोदर पाच युद्धनौकांचे जलावतरण २०१९ ते २०२२ दरम्यान करण्यात आले आहे.
‘प्रोजेक्ट १७ अल्फा’ ची जहाजे भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने इन-हाउस डिझाइन केली आहेत. त्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आले आहे. या युद्धनौकेत दोन हेलिकॉप्टरही तैनात करता येतील.
INS विंध्यगिरीची वैशिष्ट्ये
युद्धनौका अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्स आणि ऑटो मेलारा नौदल गनसह सुसज्ज आहेत. शत्रूच्या जहाजावर किंवा हेलिकॉप्टरवर हल्ला करून नष्ट करू शकतात. याशिवाय विंध्यगिरी हे बराक-८ क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहे. INS विंध्यगिरी युद्धनौका उत्कृष्ट स्टिल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे, सेन्सर्स, प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली, नवीनतम रडार प्रणाली आणि पाणबुडीविरोधी शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.
या पूर्वी INS निलगिरी, INS हिमगिरी, INS उदयगिरी, INS दुनागिरी आणि INS तारागिरी ही पाच जहाजे तैनात करण्यात आली आहेत. INS विंध्यगिरी हे सहावे जहाज असून सातव्या युद्धनौकेचे नाव नवीन असेल. हे २०२५ मध्ये लॉन्च केले जाईल.
हे ही वाचा:
हिमाचलमधील भूस्खलनाला बेबंद बांधकामे कारणीभूत
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भारतात नव्हे अफगाणिस्तानात; नऊ पत्रकारांना अटक
नो आयडी नो एंट्री, दारूवर बंदी; जाधवपूर विद्यापीठाची नवीन नियमावली !
कोट्यवधीच्या ड्रग्ससह अकरा जणांना अटक
पीटीआयच्या वृत्तानुसार, जुनी विंध्यगिरी जुलै १९८१ ते जून २०१२ अशी एकूण ३१ वर्षे नौदलात राहिली. या कालावधीत युद्धनौकेने अनेक आव्हानात्मक मोहिमा आणि परदेशातील सरावही पाहिले. आता नव्या तंत्रज्ञानासह नवीन विंध्यगिरी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.