पुण्यातील गिर्यारोहकांनी सर केली ६५१० मीटर उंची

पुण्यातील गिर्यारोहकांनी सर केली ६५१० मीटर उंची

‘माऊंट मंदा-१’ या ६५१० मीटर उंच आणि चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड शिखरावर पुण्याच्या गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली. भारतीयांकडून पहिल्यांदाच उत्तर धारेकडून चढाईची मोहीम यशस्वी झाली असून, भारतीय गिर्यारोह्कांनी गिर्यारोहणाच्या इतिहासातील नवा अध्याय रचला आहे. गिरिप्रेमी संस्थेच्या डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे व पवन हडोळे यांनी हा शिखरमाथा गाठला असून, त्यांना मिन्ग्मा शेर्पा व निम दोर्जे शेर्पा यांनी साथ दिली. एव्हरेस्ट शिखरवीर आनंद माळी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले, तर गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी मार्गदर्शन केले होते.

हिमालयातील केदारगंगा डोंगररांगा परिसरात माउंट मंदा हा तीन शिखरांचा समूह आहे. त्यापैकी ‘माऊंट मंदा-१’ हे ६५१० उंचीचे शिखर अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. या शिखरावर आजपर्यंत फारच कमी मोहिमांचे आयोजन केले गेले असून, या शिखराने बहुतांश वेळा गिर्यारोहकांना हुलकावणी दिली आहे. गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी या आधी १९८९ आणि १९९१ अशा दोन वेळा ‘माउंट मंदा-१’ या शिखरावर मोहीम आयोजित केली होती. मात्र, त्यामध्ये यश मिळाले नव्हते. आता ३२ वर्षांनी हे शिखर शनिवारच्या (१८ सप्टेंबर) सकाळी यशस्वीपणे सर करण्यात आले.

हे ही वाचा:

कोण होणार नवे हवाई दल प्रमुख?

हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द

नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला

गिरिप्रेमीच्या दुसऱ्या संघाने केदारगंगा पर्वतरांगेतलीच ‘माउंट भृगुपर्वत’ या शिखरावरही यशस्वी चढाई केली. या मोहिमेत आनंद माळी, वरुण भागवत, ऋतुराज आगवणे, अंकित सोहोनी व रोहन देसाई यांनी सहभाग नोंदवला. ‘माउंट मंदा-१’ आणि ‘माउंट भ्रिगू पर्वत’ या दोन्ही मोहिमांचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये ‘व्हाईट मॅजिक’ या संस्थेने मोलाचे सहकार्य केले.

‘माउंट मंदा-१’ हे सर्वार्थाने आव्हानात्मक शिखर आहे. हे शिखर गिर्यारोहकांचे कठोर परीक्षा पाहणारे आहे. येथील शिखर चढाईसाठी गिर्यारोहक मानसिक व शारीरिकदृष्ट्या अतिशय कणखर असावा लागतो. अशा आव्हानात्मक शिखरावर गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी मिळविलेले यश हा भारतीय गिर्यारोहण क्षेत्रातील एक सुवर्ण क्षण आहे, असे मत गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version