भारताच्या पुरुष ऍथलेटिक्स संघाने विक्रमी वेगाने अंतिम फेरीत मारली धडक

भारताने नोंदविलेल्या वेळेमुळे मागे टाकला आशियाई विक्रम

भारताच्या पुरुष ऍथलेटिक्स संघाने विक्रमी वेगाने अंतिम फेरीत मारली धडक

भारताच्या पुरुष संघाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत बुडापेस्ट, हंगेरी येथील जागतिक अजिंक्यपद ऍथलेटिक्स स्पर्धेत ४ बाय ४०० मीटर रिले अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी मध्यरात्री त्यांची अंतिम फेरी रंगणार होती. भारतीय संघातील मोहम्मद अनास, अमोज जेकब, मोहम्मद अजमल वारियाथोडी व राजेश रमेश यांनी २ मिनिटे, ५९.०५ सेकंद अशी वेळ देत पहिल्या प्राथमिक फेरीत दुसरे स्थान मिळविले. अमेरिकेनंतर भारताने क्रमांक मिळविला होता.

 

 

दोन फेऱ्यांमधील पहिल्या तीन संघांना अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी होती. भारतीय पथकाने २ मिनिटे ५९.५१ सेकंद ही आशियाई वेळ मागे टाकत नव्या विक्रमाची नोंद केली. शिवाय, त्यांनी ३ मिनिटे ०.२५ सेकंद हा राष्ट्रीय स्तरावर केलेला विक्रमही मागे टाकला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अनास, नोह निर्मल तोम, आरोकिया राजीव व अमोज जेकब यांनी हा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.

 

हे ही वाचा:

भारतातील चैतन्य, विविधता पाहून जी-२० परिषद प्रभावित!

गॅलेक्सी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत तीन दगावले

आदित्य एल-१ मोहीम उलगडणार सूर्याचे कोडे

आईच्या हातच्या रस्समची चव चाखत प्रज्ञानंदने जग जिंकले

 

बुडापेस्ट येथील या स्पर्धेत जेव्हा प्रत्यक्ष प्राथमिक फेरीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या टप्प्यात भारतीय संघ सहाव्या स्थानावर होता. पण अमोज जेकबने दुसऱ्या टप्प्यात जोर लावला आणि भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. नंतरच्या दोन टप्प्यांत मोहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांनी तोच वेग कायम राखत भारताला दुसरा क्रमांक टिकविला.

 

 

अमेरिकेने या फेरीत पहिला क्रमांक मिळविला. त्यांनी २ मिनिटे ५८.४७ सेकंद अशी वेळ दिली. तर तिसऱ्या क्रमांकावर ग्रेट ब्रिटन होते. त्यांनी २ मिनिटे ५९.४२ सेकंद अशी वेळ दिली.

 

 

भारतीय पथकाच्या या दमदार कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. भारतीय ऍथलेटिक्ससाठी ही ऐतिहासिक कामगिरी आहे. भारतीय संघाने नवा आशियाई विक्रम करून दाखविला आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

 

Exit mobile version