पुरूष हाॅकी संघ पराभूत, पण पदकाची अपेक्षा कायम!

पुरूष हाॅकी संघ पराभूत, पण पदकाची अपेक्षा कायम!

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विश्वविजेत्या बेल्जियम संघाने भारताचा ५-२ असा पराभव केला. पण तरिही भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले नाही. भारतीय संघ आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे. त्यामुळे संघाकडून असलेली पदकाची अपेक्षा अजूनही पूर्णपणे संपलेली नाही.

मंगळवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता हा सामना सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच हा सामना रोमहर्षक होणार हे दिसत होते. कारण सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पाहायला मिळत होता. बेल्जियमला सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यावर गोल करत त्यांनी सामन्यात आघाडी घेतली. पण पुढे त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही. भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. तर पुढे मनजीतने भारताला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियम संघाकडून पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात बरोबरी साधली.

पुढे तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाने गोल करून बढत घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात कोणालाही यश आले नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये बेल्जियम संघाने शानदार प्रदर्शन केले. पहिल्यांदा त्यांनी पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी केलेल्या फाऊलवर त्यांना पेनल्टी मिळाली. बेल्जियम संघाने त्याचाही फायदा घेतला आणि सामन्यात ४-२ अशी आघाडी मिळवली.

पुढे सामन्याला तीन मिनिटांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना भारतीय संघाने एक महत्त्वपूर्ण बदल केला. आपल्या गोलकिपरला बाहेर बोलावत त्याच्या जागी आक्रमण करण्यासाठी एक खेळाडू मैदानात उतरवण्यात आला. पण त्याचा फायदाही बेल्जियमनेच घेतला आणि सामन्यातील पाचवा गोल नोंदवला. बेल्जियमचा स्टार खेळाडू हेंड्रिक्स या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने सामन्यात तीन गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली.

Exit mobile version