ओमानच्या सालालाहमध्ये सुरू असलेल्या ज्युनिअर आशियाई कप हॉकी स्पर्धेत भारताच्या संघाने इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होता. गुरुवारी झालेल्या या सामन्यात भारताने पाकला २-१ने पराभूत करून चषकावर नाव कोरले.
हा सामना जिंकून भारताने इतिहास रचला आहे. या विजयामुळे भारताचा ज्युनिअर हॉकी संघ सर्वाधिक चारवेळा आशियाई कप जिंकणारा संघ ठरला आहे. त्यांनी तीनवेळा हा कप जिंकणाऱ्या पाकिस्तानला मागे टाकले आहे.
आठ वर्षांनंतर झाली स्पर्धा
यंदाची आशियाई कप ज्युनिअर हॉकी स्पर्धा तब्बल आठ वर्षांनी झाली. याआधी ही स्पर्धा २०१५मध्ये मलेशियामध्ये झाली होती. या संपूर्ण हंगामात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. भारताने उपांत्य सामन्यात दक्षिण कोरियाला ९-१ने पराभूत केले होते. तर, पाकिस्तानने मलेशियाला ६-२ने हरवले होते.
हे ही वाचा:
रायगडचा इतिहास सांगणाऱ्या गाईडना पाच लाखांचा विमा
दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधानांना भेटणार!
साक्षीच्या हत्येत वापरलेला चाकू सापडला; साक्षीच्या शरीरावर ३४ जखमा
सायनमध्ये भरदिवसा हैदराबादच्या ज्वेलर्सचे अपहरण करून केली २ कोटींची लूट
भारतीय संघाकडून ५० गोल
उत्तम सिंह याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. साखळी स्पर्धेत भारताने चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले तर, एक सामना ड्रॉ झाला. भारताच्या गटात पाकिस्तान, थायलंड, जपान आणि चीन तैपेई या देशांचा समावेश होता. भारताने साखळी सामन्यांत ३९ गोल केले, तर भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांना केवळ दोन गोल करता आले. संपूर्ण स्पर्धेत भारताने ५० गोल केले असून, भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाला केवळ चार गोल करता आले.