आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघाने चौथ्यांदा नाव कोरले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा ४-३ ने धुव्वा उडवला. चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेचा अंतिम सामना रोमहर्षक ठरला. या सामन्यात भारत एका वेळी ३-१ ने पिछाडीवर होता, त्यामुळे भारतीय संघाच्या चाहत्यांच्या अशा मावळल्या असताना संघाने पुनरागमन करत थेट विजेतेपदाला गवसणी घातली.
भारतीय संघाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एका मिनिटात दोन गोल करत सामना खिशात घातला. चौथ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल करत भारतीय संघाने हा सामना ४-३ असा जिंकून चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर आता भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. त्यामागे पाकिस्तानने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे.
या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. अंतिम सामन्यात हाफ टाइमपर्यंत मलेशियाचा संघ ३-१ ने आघाडीवर होता. त्याआधी जुगराज सिंगने नवव्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यानंतर भारतीय संघाची कामगिरी घसरली आणि मलेशियाने आघाडी घेतली होती. १४ व्या मिनिटाला अझराई अबू कमालने केलेल्या फील्ड गोलच्या जोरावर मलेशियाने बरोबरी साधली.
यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये १८व्या मिनिटाला राहीझ राजीने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि २८व्या मिनिटाला मोहम्मद अमिनुद्दीनने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅगफ्लिक करून आपल्या संघाला भारताविरुद्ध ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारताने काही सोपे पेनल्टी कॉर्नरही गमावले.
हे ही वाचा:
राज्यात ह्युंदाई कंपनी चार हजार कोटींची गुंतवणूक करणार
‘मणिपूर हिंसाचारावर लष्कर हा तोडगा नाही’
त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!
विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी रॅगिंग करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला अटक
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पुनरागमन केले. एका मिनिटात दोन गोल करत स्कोअर ३-३ केला. चौथ्या क्वार्टरच्या ५६ व्या मिनिटाला भारतीय संघाने चौथा गोल केला. अशाप्रकारे भारतीय संघ चॅम्पियन ठरला. यापूर्वी भारताने २०११, २०१६ आणि २०१८ मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. २०१८ मध्ये भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते होते, कारण अंतिम सामना रद्द झाला होता.