भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३च्या उपांत्य सामन्यात धडक दिली आहे. भारताने सोमवारी गतविजेत्या दक्षिण कोरियावर ३-२ने मात करून अंतिम चार संघांत स्थान मिळवले. भारताकडून नीलकांत शर्मा (सहावे मिनिट), कर्णधार हरमनप्रीत सिंग (२३वे मिनिट) आणि मनदीप सिंग (३३वे मिनिट) यांनी गोल केले. तर, कोरियाच्या किम सुंगह्युन (१२वे मिनिट) आणि यँग जीहून (५८वे मिनिट) यांनी दोन गोल केले.
कोरियावर मात केल्याने भारताने चार सामन्यांत मिळून १० गुण मिळवले असून या गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. यजमान भारतीय संघाने आतापर्यंत तीन सामन्यांत विजय मिळवला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना बुधवारी, पाकिस्तानशी होईल.
हे ही वाचा:
मोहोब्बत की दुकान, चायना का सामान; भारतविरोधी कारवायांसाठी चीनचे न्यूजक्लिकला फंडिंग
सेप्टिक टॅंकमधील मृतदेहाचे गूढ उकलले; एकाला अटक
टोमॅटो भडकल्याने शाकाहारी थाळीच्या दरात २८ टक्के वाढ
टेस्लाला प्राप्त होणार भारतीय ‘वैभव’
कोरियाविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच भारताची पकड घट्ट होती. शमशेर सिंहने सहाव्या मिनिटाला नीलकांतला पास देऊन गोल केला आणि भारताचे खाते उघडले. लगेचच तीन मिनिटांनंतर गोल करण्याची संधी भारतापुढे होती, मात्र सुखजीत आणि आकाशदीप या दोघांचे प्रयत्न अपुरे पडले. कोरियाने लवकरच सामन्यावर पकड बसवली. मानजे जंग याने १२व्या मिनिटाला किम को सार्किल याला चेंडू सोपवला आणि किमने त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरवत भारताचा गोलकिपर कृष्णा पाठक याला चकवून कोरियासाठी पहिला गोल नोंदवला.
भारताला हाफ टाइमच्या आधी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यातील एकाचे रूपांतर गोलमध्ये करण्यात हरमनप्रीतला यश आले आणि भारताने २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर मनदीपने गोल केला. पाहुण्या संघाने पुढील १० मिनिटे एकूण चार पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्यामुळे सामना बरोबरीचा होण्याची भीती होती. कोरियाने ५८व्या मिनिटाला गोल केला. मात्र त्यानंतर भारतीय खेळाडू सामना संपेपर्यंत चेंडू स्वत:च्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले आणि भारतीय संघाने कोरियावर ३-२ने मात केली.