इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने‘ऑपरेशन अजय’हाती घेतल्याची घोषणा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘एक्स’या समाजमाध्यमावर ‘ऑपरेशन अजय’बाबत माहिती दिली. इस्रायलमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून मोहीम अमलात आणण्यासाठी विशेष विमानांसह अन्य व्यवस्थांचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी जाहीर केले. इस्रायलमध्ये किमान २० हजार भारतीय नागरिक राहात आहेत, मात्र किती भारतीय इस्रायलमध्ये अडकले आहेत, याचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही, अशी माहिती मुंबईतील इस्रायलचे वाणिज्य दूत कोब्बी शोशानी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!
२०२४ साठी काँग्रेसचे फोडा आणि सत्ता ओढा धोरण…
शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत
नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे घसरले; पाच ठार, ८० जखमी
इस्रायलमधील भारतीयांना मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे नवी दिल्लीमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच, तेल अविव आणि रामाल्लाह येथे स्वतंत्र आपत्कालीन हेल्पलाइनही सुरू करण्यात आल्या आहेत.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी जयशंकर यांना पत्र लिहून केरळमधील सुमारे सात हजार नागरिक इस्रायलमध्ये अडकल्याचे तसेच, त्यांच्या सुरक्षेबाबत पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. तर, तमिळनाडूमधीलही ८४ जण इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती आहे. हे सर्व भारतीय शिक्षण, व्यापार अथवा पर्यटनासाठी गेले असल्याचे तमिळनाडू सरकारतर्फे जाहीर करण्यात आले.
इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुशरत भरुचा हीदेखील रविवारी मुंबईला परतली. ती तेथील हायफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेली असताना युद्धाचा भडका उडाला.
ब्रिटिश परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेवर्ली यांनी बुधवारी हमासविरोधी युद्धात इस्रायलला पाठबळ देण्यासाठी जेरूसलेमला भेट दिली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथोनी ब्लिंकनही लवकरच जेरूसलमेमला भेट देतील, असे त्यांच्या विभागाने स्पष्ट केले.