कोरोना विरुद्धच्या लढाईत अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जसजशी रुग्णसंख्या वाढत चालली आहे तसतशी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढत आहे. अशा परिस्थिती अनेक ठिकाणी हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे समोर येत आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच भारत सरकारने या इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आल्या दिवशी कोरोनाचे भरमसाठ रुग्ण देशात वाढत आहेत. या रुग्णांच्या उपचारांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची खूप जास्त आवश्यकता भासत आहे. त्यामुळे भारत सरकारने या संदर्भात निर्णय घेत या इंजेक्शनची निर्यात बंद करायचा निर्णय घेतला आहे. रविवार ११ एप्रिल रोजी संध्याकाळी सरकारने आपल्या या निर्णयाची घोषणा केली. भारतात सध्या ११ लाखपेक्षा अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. येणाऱ्या काळात या मागणीत आणखीन वाढ होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील आव्हानांचा विचार करता हा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री, टास्क फोर्सचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’
लॉकडाउनचा पेच, संभ्रमाचा चक्रव्यूह
काशी विश्वेश्वराच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्यांना धमकीचे फोन
‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’
देशात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढून त्याचा काळाबाजारही वाढल्याचे काही घटनांमधून स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थिती सरकार कडून रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना हे सांगण्यात आले आहे की त्यांनी त्यांच्या साठ्याची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. या सोबतच वितरकांच्या संदर्भातही माहिती द्यावी असे सांगण्यात आले आहे. तर ड्रग इंस्पेक्टर्सना सांगण्यात आले आहे की त्यांनी या साठ्याचे नियमित परीक्षण करावे.