आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. भारताने बांगलादेश संघाचा ९ गडी राखून पराभव केला. आता भारतीय संघ शनिवारी अंतिम सामना खेळणार आहे.
ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशाच्या संघाची फलंदाजी यशस्वी होऊ दिली नाही. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने केवळ ९६ धावा केल्या. या धावा करताना सलामी फलंदाज पी. एमोन याने ३२ चेंडूत दोन षटकारांसह २३ धावा केल्या. त्यानंतर जे अली याने २९ चेंडूत २४ धावा केल्या आणि आर. हसन याने १४ धावा जोडल्या. इतर एकाही फलंदाजाला दोन अंकी आकडा जोडता आलेला नाही. तर, भारतीय गोलंदाज साई किशोर याने ३ खेळाडूंना तंबूत धाडले तर वॉशिंग्टन सुंदरने २ बळी घेतले.
हे ही वाचा:
गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी
संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही
खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स
लेझर लाईटनंतर डीजेच्या आवाजामुळे पोलिसांना कानाचा त्रास
बांगलादेश संघाने केलेल्या ९६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ९.२ षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. तिलक वर्माने नाबाद ५५ धावा केल्या. तर, ऋतुराज गायकवाडने नाबाद ४० धावा केल्या. बांगलादेशकडून रिपन मोंडलने एकमेव विकेट घेतली. या स्पर्धेत आता भारताचे किमान रौप्य पदक निश्चित आहे. भारताचा सामना अंतिम फेरीत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातील विजेत्याशी होणार आहे.