भारतीय संघाला विमानतळावरच पावसाने गाठले

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ दाखल

भारतीय संघाला विमानतळावरच पावसाने गाठले

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यावर भारतीय संघाचे स्वागत पावसाने केले. डर्बन येथे भारतीय संघ विमानातून उतरल्यानंतर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे भारतीय संघाची पळापळ झाली. येत्या रविवारपासून भारताच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे.

विमानतळावरून बाहेर येत असताना आलेल्या पावसामुळे खेळाडूंची तारांबळ उडाली. काही खेळाडू आपापल्या बॅग डोक्यावर घेऊन धावत असताना व्हीडिओत दिसत होते. बसपर्यंत जातानाच नेमका पाऊस कोसळू लागला होता. पण हे खेळाडू हॉटेलवर पोहोचल्यानंतर मात्र सगळे वातावरण बदलले. विमानतळावरही खेळाडूंचे स्वागत चाहत्यांनी अगदी जोशात केले. तिथे आपल्या चाहत्यांसह खेळाडूंनी छायाचित्रेही काढली.

भारतीय क्रिकेट बोर्डाने यासंदर्भातील एक व्हीडिओ आपल्या एक्स हँडलवर टाकला आहे. त्यात खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील विमानतळावर येत आहेत आणि त्यांचे स्वागत कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे, असे दिसत आहे.
भारतीय संघातील सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड, मोहम्मद सिराज हे या व्हीडिओत दिसत आहेत.

हे ही वाचा:

फाशी प्रकरणी कतारमधील नौसैनिकांना भारतीय राजदूत भेटले!

हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरची अधिवेशनात ‘एन्ट्री’!

१०० कोटी रुपयांच्या विदेशी निधीप्रकरणात ८० मदरसे रडारवर

करणी सेनाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी दोन पोलिस निलंबित

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रित बुमराह हे मात्र टी-२० आणि वनडे मालिकेला मुकणार आहेत. सूर्यकुमार यादवकडे टी-२० मालिकेचे नेतृत्व आहे तर के.एल. राहुल वनडे मालिकेचा कर्णधार असेल. रिंकू सिंग, तिलक वर्मा, साई सुदर्शन व रजत पाटीदार हे वनडे संघातून खेळणार आहेत.

या पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या मालिका आटोपल्यानंतर दोन कसोटी सामन्यांसाठी काही सीनियर खेळाडू दक्षिण आफ्रिकेला जातील. ही मालिका २६ डिसेंबरला सुरू होईल. सेंचुरियनला पहिली कसोटी होत आहे. तर ३ जानेवारी २०२४पासून दुसरी कसोटी केपटाऊन येथे होईल.

भारतासाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची असेल कारण आतापर्यंत एकदाही भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळणार आहे. त्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका आहे. ही मालिका १४ डिसेंबरपर्यंत चालेल. नंतर १७ डिसेंबरपासून भारतीय संघ वनडे मालिकेत खेळेल. २१ सप्टेंबरपर्यंत ती मालिका चालणार आहे.

तिन्ही मालिकांचे भारतीय संघ

कसोटी मालिका

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टिरक्षक), के.एल. राहुल (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

टी-२० मालिका

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

वनडे मालिका

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

Exit mobile version