बुधवार, ४ ऑगस्ट रोजी टोकियो ऑलिम्पिक २०२० मधून भारतासाठी खुशखबर आली आहे. भारताचा नीरज चोप्रा हा खेळाडू भालाफेक या खेळाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. तर भारताचे कुस्तीपटू रविकुमार दहिया आणि दीपक पूनिया हे दोघेही उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.
बुधवारचा दिवस ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडा रसिकांसाठी फारच खास राहिला. भालाफेक या खेळातील गोड बातमीने दिवसाची सुरुवात झाली. भालाफेक या खेळाच्या पात्रता फेरी मध्ये अ गटात भारताचा नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटरवर भाला फेकत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे दोन्ही गटात मिळून सर्वात लांब भाला नीरजनने फेकला. पण त्याचवेळी ब गटातील आपला खेळाडू शिवपाल सिंह याला मात्र अंतिम फेरीसाठी पात्र ठरता आले नाही.
पुढे कुस्तीतही भारताने पोडियम फिनिशसाठी प्रबल दावेदारी सादर केली आहे. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या फ्री स्टाईल प्रकारात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. रवी त्याचा पहिला सामना १३-२ या फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला. तर उपांत्यपूर्व फेरीत बल्गेरियन कुस्तीपटू जॉर्जी वॅनगेलोव्ह याला १४-४ चार अशी धूळ चारत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
तर फ्री स्टाईल प्रकारच्या ८६ किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू दीपक पूनिया याने देखील उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित करताना जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले आहे. त्याने पहिल्या फेरीत नायजेरियन कुस्तीपटूला १२-१ असे हरवले. तर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चायनीज कुस्तीपटू लिन झुशेन याला ६-३ पराभूत करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
हे ही वाचा:
इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवायला भारत सज्ज
‘रॉ’ एजंटच्या भूमिकेत दिसणार ‘खिलाडी’ कुमार! बघा ‘बेलबॉटम’ चा धमाकेदार ट्रेलर
ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला राज्यपालांची टाचणी
…म्हणून काँग्रेस नेत्याला केले समर्थकांनीच ट्रोल
पण दुसरीकडे महिला कुस्तीच्या फ्री स्टाईल प्रकारात ५७ किलो वजनी गटात भारताची अंशू मलिक हिचा पहिल्याच फेरीत पराभव झाला आहे. बेलारूसची कुस्तीपटू इरियाना हिने अंशु मलिकचा ८-२ असा पराभव केला आहे. पण तरीही अंशू मलिकचे स्पर्धेतील आव्हान अजून संपुष्टात आलेले नाही. बेलारुसची कुस्तीपटू इरियाना ही सध्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. ती जर अंतिम फेरी गाठू शकली तर अंशू मलिकला कांस्य पदक जिंकायची संधी मिळणार आहे.
रवी दहिया आणि दीपक पुनिया या दोघांचेही उपांत्य फेरीचे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार आजच दुपारी २.४५ वाजता पाहता येणार आहेत. तर भारताची बॉक्सर लोवलीना बोरगोहेन हिचा उपांत्य फेरीचा सामना सकाळी ११ वाजता सुरू होईल. टर्कीची बॉक्सर सुरमेनेली हिच्या सोबत तिची लढत असेल. तर दुपारी ३.३० वाजता भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत अर्जेंटिनाला भिडणार आहे.