रविवारी अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारताने निर्णायक एक दिवसीय सामन्यात विजय मिळवला. यासोबतच भारताने एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. इंग्लंड विरोधातील कसोटी, टी-२० आणि एक दिवसीय मालिकांमध्ये विजय मिळवत भारताने मालिका विजयाची हॅट्रिक केली आहे.
भारत – इंग्लंड यांच्यातील एक दिवसीय मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी पुणे येथे खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने शतकीय भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्माने ३७ धावा केल्या तर धवनने ६७ धावा करत अर्धशतक केले. त्यानंतर विराट कोहली, के.एल.राहुल लवकर बाद झाले. पण रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी केली. पंतने ७८ तर पांड्याने ६४ धावा करत अर्धशतक ठोकले. त्यानंतर कृणाल पांड्या, शार्दूल ठाकूरने प्रत्येकी २५ आणि ३० धावा करत भारताची धावसंख्या ३२९ पर्यंत नेली.
हे ही वाचा:
मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे
कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक
वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ
लॉकडाऊनच्या तयारीला लागा…मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात डळमळीत झाली. सलामीचे दोन्ही फलंदाज स्वस्तात परतले. नंतर बेन स्टोक्सने ३५ आणि डेव्हिड मलानने ५० धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची विकेटही गेल्यावर इंग्लडच्या हातातून हा सामना हळू हळू निसटत जाताना दिसत होता. पण अष्टपैलू खेळाडू सॅम करन याने सामना जिंकण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्याने नाबाद ९५ धावा ठोकल्या. त्याला लिविंगस्टोन आणि मोईन अली यांनी ३६ आणि २९ धावा करून साथ देण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. इंग्लंड संघ ५० षटकांत ९ बाद ३२२ धावाच करू शकला.
फलंदाजी,गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतीत झालेल्या सांघिक कामगिरीमुळे भारताने या सामान्यासोबत मालिकाही खिशात टाकली. या सामन्यातील खेळीसाठी सॅम करनला सामनावीर पूरसाकारने सन्मानीत करण्यात आले. तर इंग्लिश फलंदाज जॉनी बेस्ट्रॉवला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.