भारताने पाकिस्तानसोबत नाणेफेक करून जिंकली होती राष्ट्रपती वापरत असलेली ‘बग्गी’

बग्गीची आणि भारताची एक रंजक कथा

भारताने पाकिस्तानसोबत नाणेफेक करून जिंकली होती राष्ट्रपती वापरत असलेली ‘बग्गी’

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आज, २६ जानेवारी रोजी साजरा होत आहे. देशभरात याचा उत्साह असून दिल्लीच्या कर्तव्यपथावर संचलनही सुरू झाले आहे. यंदा दिल्लीमध्ये होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख अथिती म्हणून उपस्थित आहेत. विशेष म्हणजे ते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत ऐतिहासिक अशा बग्गीमध्ये कर्तव्यपथावर दाखल झाले.

राष्ट्रपतींची ही बग्गी ऐतिहासिक आहे. या बग्गीची आणि भारताची एक रंजक कथा आहे. राष्ट्रपतींची ही बग्गी ब्रिटिशकालीन आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, तेव्हा सर्व गोष्टींचे वाटप केले जात होते. यामध्ये ही बग्गी पाकिस्तानला न मिळता भारताला मिळाली होती.

यामागची कहाणी अशी आहे की, दोन्ही देशांमधील वस्तूंची वाटपाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले होते. भारताकडून एच. एम. पटेल हे प्रतिनिधी होते, तर पाकिस्तानकडून चौधरी मोहम्मद अली हे प्रतिनिधी होते. तेव्हा ही बग्गी कोणाला मिळणार यासाठी दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाला. न थांबणारा वाद लक्षात घेऊन राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचे चीफ यांनी एक युक्ती शोधून काढली.

बग्गी भारताला मिळणार की पाकिस्तानला मिळणार याचा निर्णय नाणेफेक करून घ्यायचा अशी कल्पना त्यांनी मांडली. दोन्ही प्रतिनिधींनीही हे मान्य केलं. हा टॉस बॉडिगार्ड रेजिमेंटचे भारतीय प्रतिनिधी ले. कर्नल ठाकुर गोविंद सिंह आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी याकूब खान यांच्यामध्ये झाला. हा टॉस भारताने जिंकला आणि बग्गी भारताला मिळाली.

१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बग्गींऐवजी बुलेट प्रूफ वाहनांचा वापर सुरू झाला. ही बग्गी जवळपास ३० वर्षांपासून वापरली जात नव्हती. २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा एकदा ही बग्गी वापरण्यास सुरुवात केली. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्याची स्वारी केली. आणि आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ऐतिहासिक बग्गीतून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कर्तव्याच्या मार्गावर पोहोचल्या.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

जम्मू-काश्मीर: प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी!

मालदीवमधून लष्कर माघारी बोलावण्याचे कोणतेही आदेश नाहीत!

गर्दीच्या दबावतंत्राची अखेर…

राष्ट्रपतींच्या या बग्गीसोबत त्यांचे अंगरक्षक देखील असतात. बग्गीला ओढणारे आणि अंगरक्षकांचे एकूण मिळून ५५ घोडे या ताफ्यात सहभागी असतात. यातील सहा घोडे हे बग्गीला ओढतात. या ताफ्यामधील अंगरक्षकांचा खास युनिफॉर्म असतो. लाल रंगाचे लांब कोट, निळ्या-सोनेरी रंगाची साफा-स्टाईल पगडी, पांढरे हातमोजे अशा प्रकारचा युनिफॉर्म असतो. त्यांच्या पायात नेपोलियन बूट असतात, तसंच त्यांच्या हातात नऊ फूट नऊ इंच मोठे भालेही असतात. तसंच काही सैनिकांकडे म्यानातील तलवार देखील असते.

Exit mobile version