रविवारी झालेल्या तिसऱ्या टी- २० सामन्यात भारताने श्रीलंकेवर विजय मिळवत अनेक विक्रम मोडीत काढत नव्याने रचले आहेत. भारताने हा सामना सहा गडी राखत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.
धरमशाला येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. मोहम्मद सिराज याने पहिल्याच षटकात दनुष्का गुणथिलकाला (०) माघारी धाडले. तर आवेश खानने या सामन्यात मिळालेल्या संधीचे सोने करत पथुम निसंका (१) आणि चरिथ असलंकाला (४) झटपट तंबूचा रस्ता दाखवला. रवी बिश्नोईने जनिथ लियांगेला (९) बाद केल्याने श्रीलंकेची ४ बाद २९ अशी बिकट अवस्था झाली होती. शंभर धावा तरी होतील की नाही अशी अवस्था असताना श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनकाने ३८ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ७४ धावांची खेळी करत श्रीलंकेला सावरले. त्याला आधी दिनेश चंडिमल याने २२ धावा करत आणि नंतर चमिका करूणारत्ने नाबाद १२ धावा करत मोलाची साथ दिली. त्यानंतर २० षटकांमध्ये श्रीलंकेने पाच गडी बाद १४६ धावा फलकावर जोडल्या.
हे ही वाचा:
युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक
युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण
भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक
पेशावरमध्ये भीषण स्फोट! दोन पाकिस्तानी सैनिक ठार
१४७ धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेले कर्णधार रोहित शर्मा (५) आणि संजू सॅमसन (१८) स्वस्तात माघारी आले. परंतु, याही सामन्यात श्रेयसने कामगिरीत सातत्य राखताना मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावले. श्रेयसने ४५ चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद ७३ धावांची खेळी केली. त्यानंतर दीपक हुडा (२१) आणि रवींद्र जडेजा यांच्या नाबाद २२ धावांच्या मदतीने भारतीय संघाने विजय मिळवला. सामनावीर आणि मालिकावीर या दोन्ही पुरस्कारांनी श्रेयस अय्यर याला सन्मानित करण्यात आले.
भारताने रचलेले हे नवे विक्रम-
- भारताचा हा सलग १२ वा टी- २० विजय ठरला. यासह सर्वाधिक सलग टी- २० सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तान आणि रोमेनियाच्या विक्रमाशी भारताने बरोबरी केली आहे.
- भारताचा कर्णधार रोहित शर्माचा हा १२५ वा टी- २० सामना होता. रोहित याने शोएब मलिकला मागे टाकत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी- २० सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
- श्रेयस अय्यर हा तीन सामन्यांच्या मालिकेमधील वैयक्तिक सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विराट कोहली याचा २०१६ मधील १९९ धावांचा विक्रम मोडीत काढत त्याने २०४ धावा तीन सामन्यांमध्ये केल्या आहेत.