भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली. भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ विकेट्सनी मात केली आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. याआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९३२मध्ये छोटी कसोटी खेळली गेली होती. मेलबर्नवरील ही कसोटी १०९.२ षटकांपुरतीच होती. पण आताची कसोटी ही १०७ षटकांचीच झाल्यामुळे ही सर्वात छोटी कसोटी ठरली आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने य़ा सामन्यानंतर भारतीय खेळपट्ट्यांवर टीका करणाऱ्यांना जाब विचारला आहे. रोहितला या छोट्या कसोटीबद्दल विचारणा केल्यावर तो म्हणाला की, पहिल्या दिवसापासून फिरकीला पोषक ठरणाऱ्या भारतीय खेळपट्ट्यांबाबत नेहमीच टीका करण्यात आली. त्यामुळे मला दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्य़ांबाबत कोणतीही तक्रार नाही. या खेळपट्ट्या धोकादायक आहेत पण तुम्ही इथे आव्हाने पेलण्यासाठी आलेला आहात, तुम्हाला त्याचा सामना करावाच लागेल.
या कसोटीत पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे मिळून २३ फलंदाज बाद झाले. त्यामुळे एका अर्थाने या कसोटीचे भवितव्य पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले होते. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा खेळ अवघ्या ५५ धावांत आटोपला. त्यानंतर भारताने ४ बाद १५३ असे उत्तर आपल्या पहिल्या डावात दिले होते. मात्र नंतर सहा फलंदाज एकाही धावेची भर न घालता बाद झाले आणि भारताचा डाव १५३ धावांतच आटोपला. त्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने ३ बाद ६२ अशी सुरुवात आपल्या दुसऱ्या डावात केली होती पण त्यांचा डाव १७६ धावांत आटोपला. त्यामुळे भारतापुढे अवघे ७९ धावांचे आव्हान होते. ते आव्हान भारताने ३ फलंदाज गमावून पूर्ण केले. सलामीवीर यशस्वी जयस्वालने २३ चेंडूंत २८ धावांची खेळी केली. पण ते बाद झाला नंतर विराट कोहली आणि शुभमन गिलही बाद झाले. मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी भारताला विजय मिळवून दिला.
हे ही वाचा:
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी निवड!
प. बंगालमधून दीड लाख अमेरिकन डॉलर जप्त
पश्चिम बंगालमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो
श्रमजीवी बॉम्बस्फोट प्रकरणात दोघांना फाशी
दक्षिण आफ्रिकेला खरे तर दीडशे धावांचा टप्पाही गाठता आला नसता पण ऐडन मार्करमला बाद करण्याची संधी भारताने गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दिलासा मिळाला. कसोटी क्रिकेटमधील त्याचे सातवे शतक त्याने झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात पहिला बळी गेला तो डीन एल्गरचा. त्याने १२ धावा केल्या. ही त्याची अखेरची आंतरराष्ट्रीय कसोटी होती. तो बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या तसेच भारताच्या खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या.