फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही खिशात

फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही खिशात

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडीजनंतर श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिकाही खिशात टाकली आहे. धर्मशाला येथे खेळला गेलेला श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी-२० सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचे सलामीवीर फलंदाज पाथुम निसांका आणि दानुषका गुणातिलका यांनी अनुक्रमे ७५ आणि ३८ धावांची खेळी करत श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर श्रीलंकेने मधल्या फळीत चरिथ असलांका (२), कामिल मिशारा (१) आणि दिनेश चंडीमल (९) यांना स्वस्तात गमावले. कर्णधार दासुन शनाकाच्या वादळी ४७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात ५ बाद १८३ धावा ठोकल्या. भारताच्या पाचही फलंदाजांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

हे ही वाचा:

‘ऑपरेशन गंगा’चे दुसरे विमान भारतीयांना घेऊन दिल्लीत दाखल

उत्तर प्रदेशमधून ओवैसींचा अजित पवारांवर निशाणा

पंतप्रधान मोदींकडे युक्रेनचे मदतीसाठी साकडे

‘मराठी भाषा जाती- पातीत अडकून राहू नये’

त्यानंतर फलंदाजीला उतरलेले भारताचे सलामीवीर इशान किशन (१६) आणि कर्णधार रोहित शर्मा (१) यांना भारताला चांगली सुरुवात करून देता आली नाही. लंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने रोहितला बोल्ड केले, तर लाहिरू कुमाराने इशानचा अडथळा दूर केला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी भारताचा डाव सावरला. श्रेयस अय्यरने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली. सॅमसनने २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावा केल्या. सॅमसनला कुमाराने झेलबाद केले. सॅमसननंतर मैदानात आलेल्या रवींद्र जडेजाने १८ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार ठोकत नाबाद ४५ धावा करत भारताचा विजय सोपा केला. १७.१ षटकातच भारताने हे आव्हान पूर्ण केले. श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

श्रीलंकेविरुद्धचा तिसरा आणि या मालिकेतील शेवटचा सामना आज रविवार २७ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवून ही टी-२० मालिकासुद्धा ३-० ने खिशात घालण्याची संधी आहे.

Exit mobile version