आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे क्रिकेट स्पर्धेत भारताने विजयी हॅट्ट्रिकची नोंद करताना साखळीत न्यूझीलंडचा पराभव केला. गट साखळीतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४४ धावांनी मात केली.
भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २५० धावांचे लक्ष्य ठेवले होते, भारताच्या गोलंदाजांनी किविना ४५.३ षटकात २०५ धावांवर रोखून विजय मिळवला.
फिरकीपटू वरुण चक्रवर्ती भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडला ५ तडाखे दिले.
न्यूझीलंडकडून केन विलियमसन याने सर्वाधिक ८१ धावा केल्या. त्यात ७ चौकरांचा समावेश होता. मात्र केन वगळता न्यूझीलंडच्या एकालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार मिचेल सँटनर याने २८ तर विल यंग याने २२ धावा केल्या.
हे ही वाचा:
मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा ७ मार्चला रंगणार
नवी मुंबईत ‘छावा’ चित्रपटात मस्करी करणाऱ्यांना प्रेक्षकांनी गुडघ्यांवर बसवले!
लोककला आणि नाटक याबाबत अधिक संशोधन करा
तेलंगणा: रमजानमुळे काँग्रेस सरकारने दहावीच्या परीक्षेत केला बदल!
वरुणने १० षटकात ४२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. वरुणच्या एकदिवसीय कारकीर्दीतील चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा पहिलाच सामना होता. वरुणने पहिल्याच सामन्यात ५ विकेट्स घेत ठसा उमटवला. तसेच कुलदीप यादव याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
त्याआधी भारताने ५० षटकात ९ बाद २४९ धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७९ धावा केल्या. तर अक्षर पटेल याने ४२ धावा जोडल्या. हार्दिक पंड्याने अखेरच्या क्षणी तडाखेबंद फटकेबाजी करत ४५ धावा लुटल्या. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री याने ५ बळी घेतले.