रिंकूनंतर अक्षरची कमाल; भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका जिंकली

या विजयामुळे भारताने या मालिकेत ३-१ने आघाडी घेतली

रिंकूनंतर अक्षरची कमाल; भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका जिंकली

भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील चौथ्या सामन्यात २० धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने या मालिकेत ३-१ने आघाडी घेतली आहे. शुक्रवारी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ १७५ धावांचे लक्ष्य गाठताना सात विकेट गमावून केवळ १५४ धावाच करू शकला. टी-२० मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबरला बेंगळुरूमध्ये होईल.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात आक्रमक होती. त्यांनी तीन षटकांत ४० धावा ठोकल्या. या दरम्यान ट्रेव्हिस हेडने दीपक चाहरच्या एका षटकात २२ धावा चोपल्या. भारताच्या वतीने पहिली विकेट रवि बिश्नोईने घेतली. त्याने पहिल्याच चेंडूवर जोश फिलिपला त्रिफळाचित केले. त्यानंतर अक्षर पटेलच्या फिरकीची जादू चालली. त्याने वेड, हार्डी आणि मॅकडरमॉट यांना तंबूत पाठवून ऑस्ट्रेलियाची अवस्था खराब करून टाकली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने नंतर टिम डेव्हिड आणि मॅथ्यू शॉर्ट यांच्या विकेट गमावल्या. शेवटच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलियाला ४० धावा करायच्या होत्या. मात्र मॅथ्यू हेड मागील सामन्यासारखी कमाल दाखवू शकले नाहीत. वेडने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्यात दोन चौकार आणि तेवढ्याच षटकारांचा समावेश होता. भारताच्या वतीने अक्षर पटेलने चार षटकांत केवळ १६ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. तर दीपक चाहरला दोन आणि रवि बिश्नोईने एक विकेट घेतली.

 

तत्पूर्वी नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी मिळून सहा षटकांत ५० धावा केल्या. एरॉन हार्डीने जायस्वाल याला बाद करून ही जोडी फोडली. यशस्वीने २८ चेंडूंत ३७ धावा केल्या. त्यामध्ये एक षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. यशस्वीनंतर श्रेयस अय्यर आणि कर्णधार सूर्यकुमार यादवही झटपट बाद झाले.

हे ही वाचा:

गांगुली म्हणतात, “कर्णधार म्हणून रोहितच बेस्ट!”

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला सात महिने ठेवले ओलीस!

अजित पवार निर्मित ‘बिनपैशाचा तमाशा’ सिझन-२

मुंबईत ‘रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनचे आयोजन!

६३ धावांमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंह यांनी ४८ धावांची भागीदारी रचली. ऋतुराजने तीन चौकार आणि एक षटकार खेचून २८चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. तर, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनी धुवांधार फटकेबाजी करून भारताची धावसंख्या ९ विकेट गमावून १७४वर नेली. रिंकू सिंहने भारताकडून सर्वाधिक ४६ धावा केल्या. रिंकूने २८ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकार लगावले. तर जितेशने १९ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बेन ड्वारशुइसने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, तन्वीर संघा आणि जेसन बेहरेनडॉर्फ प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Exit mobile version