पर्थचा अभेद्य किल्ला भेदला! भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी ऐतिहासिक विजय

पर्थमधील स्टेडियममध्ये विजय मिळवणारा भारत पहिलाच परदेशी संघ

पर्थचा अभेद्य किल्ला भेदला! भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी ऐतिहासिक विजय

बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियात पाच कसोटींची मालिका सुरु आहे. या स्पर्धेचे सामने खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया येथे असून पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला. पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला तब्बल २९५ धावांनी नमवले आहे. या विजयासह भारताने या स्पर्धेत आघाडी घेतली आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराह याच्याकडे पहिल्या सामन्यासाठीचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. फलंदाजीमधील जबरदस्त प्रदर्शन आणि गोलंदाजीमधील उत्कृष्ट खेळी या जोरावर भारतीय संघाने आपला विजय मिळवला आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर चौथ्याच दिवशी २९५ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५३४ धावांचे मोठे आव्हान भारताने दिले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने अक्षरशः गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा खेळ ५८.४ ओव्हरमध्ये २३८ धावांवर गुंडाळला. युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल, फलंदाज विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह हे भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच भारत पर्थमधील स्टेडियममध्ये विजय मिळवणारा पहिलाच परदेशी संघ ठरला. शिवाय या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची फारशी चांगली सुरुवात झाली नव्हती. अवघ्या १५० धावा करून भारतीय संघ तंबूत परतला होता. केएल राहुल याने २६ धावा, रिषभ पंत याने ३७ धावा आणि एन के रेड्डी याने केलेल्या ४१ धावा यांच्या जोरावर भारतीय संघाने १५० धावांचा टप्पा गाठला होता. ऑस्ट्रेलिया संघातील गोलंदाज हेजलवूड याने पहिल्या डावात सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यामागे स्टार्क, कमिन्स आणि मार्श यांनी प्रत्येकी दोन दोन भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. सामन्यात ऑस्ट्रेलिया वरचढ ठरत असतानाचं त्यांच्या पहिल्या डावात फलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला फारसे यश आले नाही. मिशेल स्टार्क याने सर्वाधिक २६ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांपुढे गुडघे टेकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने केवळ १०४ धावा केल्या. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराह याने पाच विकेट्स घेतल्या तर हर्षित राणा याने तीन आणि मोहम्मद सिराज याने दोन फलंदाजांना बाद केले.

हे ही वाचा : 

१३२ सीट, स्ट्राईक रेट ८९ टक्के, मुख्यमंत्री म्हणून भाजपचा चेहरा फडणवीसच!

संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार झियाउर बुर्क यांच्यावर गुन्हा दाखल

‘दर्शन घे काकांचं, थोडक्यात वाचलास’

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, अंदमानमध्ये ५ टन ड्रग्ज जप्त!

दुसऱ्या डावासाठी फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने संयमी खेळ दाखवत चांगली सुरुवात केली. सलामी जोडीने द्विशतकीय भागीदारी रचली. यशस्वी जयस्वाल याने विक्रमी १६१ धावांची खेळी केली तर के एल राहुल याने ७७ धावांची खेळी केली. यानंतर अनुभवी खेळाडू विराट कोहली याने शतकी खेळी केली. पडीक्कल (२५ धावा), वॉशिंग्टन सुंदर (२९ धावा) आणि एन के रेड्डी (३८ धावा) यांच्या मदतीने भारतीय संघाने ४८७ धावा करत डाव घोषित केला. भारतीय संघाने उभा केलेला धावांचा डोंगर पार करताना दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती पत्काराल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजी करताना ट्रेविस हेड याने ८९ धावा केल्या तर मार्श आणि केरी यांनी अनुक्रमे ४७ आणि ३६ धावा केल्या. बाकी फलंदाजांना फारसे यश आले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराह याने तीन तर सिराज यानेही तीन फलंदाजांना तंबूत धाडले. वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्स घेतल्या तर हर्षित आणि रेड्डी यांनी प्रत्येकी एक एक विकेट्स घेतल्या. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

Exit mobile version