भारताने कसोटी जिंकली; श्रीलंकेवर एक डाव २२२ धावांनी विजय

भारताने कसोटी जिंकली; श्रीलंकेवर एक डाव २२२ धावांनी विजय

मोहाली येथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्याचा अवघ्या तीन दिवसांमध्ये निकाल लागला. या कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. या कसोटी सामन्यात भारताने उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी करत मोठा विजय प्राप्त केला.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या जोडीने सावध सुरुवात केली. रोहितने २८ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या तर मयांक याने ४९ चेंडूत ३३ धावा केल्या. त्यानंतर हनुमा विहारी याने १२८ चेंडूत ५८ धावा केल्या तर आपल्या कारकिर्दीतली १०० वी कसोटी खेळणाऱ्या विराट कोहलीने ७६ चेंडूत ४५ धावा केल्या. त्यानंतर तुफानी फलंदाजी करत रिषभ पंत यांनी ९७ चेंडूत ९६ धावा भारताच्या धावफलकावर जोडल्या. श्रेयस अय्यर याने ४८ चेंडूत २७ धावा केल्या तर रविंद्र जडेजा याने २२८ चेंडूत नाबाद १७५ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन याने जडेजाला उत्तम साथ देत ८२ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. तर जयंत यादव आणि मोहम्मद शामी यांनी अनुक्रमे दोन आणि २० धावा जोडल्या. फलंदाजांच्या तुफान खेळीनंतर भारताने आठ गडी बाद ५७४ धावांवर डाव घोषित केला.

फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकन संघाने भारतीय गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. श्रीलंकेचा फलंदाज निस्संका याने १३३ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. याव्यतिरिक्त एकाही खेळाडूला ३० चा आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेच्या चार फलंदाजाना जडेजा आणि शामी यांनी भोपळाही फोडू न देता तंबूत धाडलं. रवींद्र जडेजा याने अष्टपैलू कामगिरी करत १३ षटकांमध्ये ४१ धावा देत पाच बळी घेतले. तर अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले. शामी याने एक बळी घेऊन श्रीलंकेचा डाव १७४ धावांमध्ये गुंडाळला.

हे ही वाचा:

भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात

झेलेन्स्की हिटलिस्टवर

४३४; फिरकीपटू अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

‘सामना’च्या पुणे आवृत्तीतील नरेंद्र मोदींच्या जाहिरातीची चर्चा

भारताकडे ४०० धावांची मोठी आघाडी होती. त्यामुळे फॉलोऑन देण्याचा निर्णय कर्णधार रोहित शर्माने घेतला. कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी पूर्णपणे योग्य ठरवत हा सामना आपल्या खिशात घातला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. सलामीवीर थिरीमन्ने याला भोपळाही फोडता आला नाही. फलंदाज करुणरत्ने (२७), निसंक्का (६), मॅथ्यू (२८), डे- सिल्वा (३०), असलंका (२०) यांनी काही धावा फलकावर जोडण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेचा फलंदाज डिकवेल्ला याने ८१ चेंडूत ५१ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्याने श्रीलंकेचा संघ अपयशी ठरला. या डावात अश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी चार चार बळी घेत श्रीलंकेच्या अर्ध्याहून अधिक संघाला तंबूत धाडले. त्यांना शामीने योग्य साथ देत दोन बळी मिळवत श्रीलंकेविरुध्दचा हा सामना भारताने एक डाव आणि २२२ धावांनी खिशात टाकला. १७५ धावा करणारा आणि एकूण नऊ बळी घेणारा रविंद्र जडेजा याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Exit mobile version