भारताने जिंकली आठव्यांदा आशियाई कबड्डी

पुरुष संघाने इराणवर केली ४२-३२ अशी मात

भारताने जिंकली आठव्यांदा आशियाई कबड्डी

जागतिक स्तरावर भारताचा कबड्डीतला दबदबा सर्वश्रुत आहे. त्याच ताकदीच्या जोरावर भारताने आशियाई कबड्डी स्पर्धेत इराणला अंतिम फेरीत ४२-३२ असे पराभूत करत आठव्यांदा आशियाई विजेते ठरण्याचा मान मिळविला.
बुसान, कोरिया येथे ही स्पर्धा पार पडली. त्यात भारताने साखळीतही इराणला पराभूत केले होते. त्यामुळे अंतिम फेरीतही भारत याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा खरी ठरली.

 

पवन सेहरावतने सुपर १० गुणांची कमाई करत या विजयात मोलाची कामगिरी बजावली. त्याला अस्लम इनामदार, अर्जुन देशवाल यांची तोलामोलाची साथ लाभली. इराणने मात्र या स्पर्धेत आपल्या ज्येष्ठ खेळाडूंना उतरवले नव्हते.
इराणने या सामन्यात आघाडी घेतली पण त्यांना ती टिकवता आली नाही. भारताने इराणपेक्षा सहा ते सात गुण अधिक राहतील याची काळजी घेतली.

 

इराणकडून सईद घफारी, मोईन शफागी, आमिरमोहम्मद तसेच मोहम्मद रझा चियानेह यांनी उपयुक्त योगदान दिले. पण इराणचे आक्रमण भारतीय आक्रमणाशी तुलना केली तर तेवढे दमदार नव्हते. चियानेहने वैयक्तिक चमकदार कामगिरी केली. त्याने तीन गुण एकाच चढाईत घेत भारताचे सगळे खेळाडू बाद केले तसचे बोनससाठी त्याने केलेले प्रयत्न फलद्रूप ठरले. त्यातून भारताला हादरे बसले पण भारताने इराणपेक्षा गुणांमध्ये मोठा फरक ठेवल्यामुळे इराणला भारताला मागे टाकणे शक्य झाले नाही.

 

भारताने चियानेहच्या या कामगिरीची दखल घेतली आणि त्याला लक्ष्य केले. त्याने पाच गुणांची कमाई करत भारताचे सर्व गडी बाद केले त्यानंतर भारताने चियानेहवर लक्ष केंद्रित केले. तो चढाईला आल्यानंतर त्याची कोंडी करण्यात भारताला यश आले. त्यानंतर इराणवरील दडपण वाढत गेले. भारत आणि इराण यांच्यातील गुणांचा फरक वाढत गेला. दोन्ही संघांत ८ गुणांचे अंतर राहिले. ते इराणला महागात पडले.

Exit mobile version