आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात भारताने कुलदीप यादवच्या चकवणाऱ्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकेवर ४१ धावांनी मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानलाही नमविले. त्यामुळे सलग दोन विजयांसह भारतासाठी अंतिम फेरीचे दरवाजे उघडले.
भारताने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात २१३ धावांपर्यंतच मजल मारली. त्यामुळे श्रीलंकेला हा सामना जिंकणे सहज शक्य आहे अशी शक्यता होती,पण कुलदीप यादवने चार बळी घेत श्रीलंकेचे स्वप्न उद्ध्वस्त केले. दुनिथ वेललागेच्या ४२ धावा आणि धनंजय डीसिल्व्हा यांच्या ४१ धावांमुळे त्यांनी निदान दीडशे धावांपर्यंत मजल मारली पण त्यांना निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी ४१ धावा कमी पडल्या.
भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. रोहित शर्मा (५३) आणि शुभमन गिल (१९) यांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली पण त्यानंतर मात्र भारतीय फलंदाज यशस्वी ठऱले नाहीत. दुनिथ वेलालागेने भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांना माघारी धाडत भारतासमोर मोठे आव्हान निर्माण केले. इशांत किशन (३३) आणि के.एल. राहुल (३९) यांनी थोडा प्रतिकार केला पण तो पुरेसा नव्हता. अक्षर पटेलने २६ धावांची खेळी केली त्यामुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे भारतीय संघाला २१३ धावांपर्यंतच मजल मारता आली. ही धावसंख्या श्रीलंकेचा संघ सहज पार करेल अशी शक्यता होती. पण श्रीलंकेला सूरच गवसला नाही.
त्यांचे सलामीवीर पाथुम निसांका (६) आणि दिमुथ करुणारत्ने (२) यांना झटपट माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. बुमराहने निसांकाला टिपले तर सिराजने करुणारत्नेला बाद केले. त्यानंतर मग ठराविका अंतराने श्रीलंकेचे फलंदाज बाद होत गेले. फक्त धनंजय सिल्व्हा आणि गोलंदाजीत चमक दाखविणाऱ्या दुनिथ वेलालागेने (४२) थोडा प्रतिकार केला. पण श्रीलंकेला ही धावसंख्या काही गाठता आली नाही.
हे ही वाचा:
डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश
ऋषी सुनक यांनी एकनाथ शिंदेंना भन्नाट किस्सा ऐकवला!
उद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे ‘विदूषक’ !
शेवटी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन झाले भारतातून जस्ट आऊट
१७ सप्टेंबरच्या अंतिम फेरीत भारतासमोर कोण?
श्रीलंकेला आता पुढील सामन्यात पाकिस्तानवर मात करावी लागेल. ही लढत १४ सप्टेंबरला होणार आहे. तर भारताचा पुढील सामना १५ सप्टेंबरला कोलंबोत होणार आहे. पण भारताने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. त्यांची गाठ आता कुणाशी पडेल हे पुढील सामन्यांमधून स्पष्ट होईल. अंतिम फेरीची लढत १७ सप्टेंबरला होणार आहे. बांगलादेशने दोन सामने गमावलेले आहेत. पण श्रीलंका, पाकिस्तानला प्रत्येकी १ विजय मिळविता आला आहे. त्यामुळे या दोन संघातच आता अंतिम फेरीसाठी स्पर्धा असेल.